पुणे :जगातील अद्वितीय असे राजा दिनकर केळकर संग्रहालय उभारणाऱ्या ज्येष्ठ संग्राहक कै.दिनकर केळकर यांना त्यांच्या १२८ व्या जयंती दिनी केळकर संग्रहालयात पुणेकरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.गुरुवारी,दि १० जानेवारी रोजी सकाळी कै.दिनकर केळकर यांच्या पुतळ्याला दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर,सौ.अरुणा श्रीकांत केळकर ,केळकर संग्रहालयचे संचालक डॉ.सुधन्वा रानडे यांनी पुष्पहार अर्पण केला.श्याम भुर्के आणि डॉ. श्रीकांत केळकर यांनी दिनकर केळकर यांच्या योगदानाची माहिती दिली.
एच.व्ही. देसाई महाविद्यालयानेही १o जानेवारी हा दिन ‘ संग्रहालय महर्षी दिन ‘ म्हणून साजरा केला.
सुरेंद्र रानडे,संग्रहालयातील कर्मचारी,पुणेकर नागरिक यावेळी उपस्थित होते. संग्रहालय पाहायला आलेल्या विद्यार्थी,नागरिकांना त्यांनी कै.दिनकर केळकर यांच्या संग्राहक वृत्तीची आणि ध्यासाची माहिती दिली.
ध्यासातून संग्रहालय उभारणारे दिनकर केळकर
पुण्यात आलेल्या कोणत्याही पाहुण्यांनी किंवा सुटीत मुलांनी भेट देण्यायोग्य जागा म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय. पुरातन वस्तूंचा एवढा प्रचंड संग्रह, तो पण एकाच व्यक्तीच्या व्यासंगातून केलेला, बहुतेक इतर कुठेही बघायला मिळायचा नाही.डॉ. दिनकर केळकर यांनी एक छंद म्हणून हा संग्रह एकत्र केला. ज्येष्ठ बंधुंसोबत ते चष्म्याचे दुकान चालवत होते. ऐतिहासिक कविता करत असताना केळकरांना आपल्या वस्तू संग्रहाच्या अनोख्या छंदाने साद घातली. १९२० मध्ये पेशव्यांचे एकेकाळचे सावकार दीक्षित पटवर्धन यांच्याकडील एक लघुचित्र त्यांनी मिळवले. ही केळकर संग्रहालयाची पहिली कलाकृती ठरली. पुढे ते जुन्या वाड्यांचे कलाकुसर असलेले दरवाजे आणि खिडक्या जमा करू लागले.
थोरले बाजीराव पेशवे यांनी बांधलेला मस्तानी महालानंतरच्या काळात दुरवस्थेत होता. तो जसाच्या तसा आणून, दुरुस्ती करून, त्याला पूर्ववत झळाळी आणून आपल्या संग्रहालयात उभा केला. अशा या केळकरांच्या अफाट संग्रहाला आधी त्यांच्या राजा या, लहान वयातच मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव त्यांनी दिले. ‘राजा संग्रह’ असे सुरवातीचे नाव होते. पुढे त्याचे ‘राजा केळकर हिस्टॉरिकल कलेक्शन’ आणि तदनंतर ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव रूढ झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे.
वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गदिमा त्यांना येथे घेऊन आले. भारावून जाऊन आणि संग्रहालयाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतरावांनी, ‘याचे लोकार्पण करा, आम्ही हे पुढे सांभाळू’ अशी तयारी दाखवताच एका सहीनिशी केळकरांनी १२ एप्रिल १९७५ ला संग्रहालयाचे लोकार्पण केले. दिनकर केळकरांना १९७८ मध्ये पुणे विद्यापीठाने डी. लिट. पदवीने सन्मानित केले. १९८१ मध्ये पद्मश्री हा सन्मानही मिळाला.
आज त्यांचे नातू सुधन्वा रानडे हे या संग्रहालयाची धुरा सांभाळत आहेत. वस्तूसंग्रह २४ हजार वस्तुंपेक्षा जास्त आहे. जागेअभावी त्यातील ११ टक्के वस्तूच लोकांना बघता येतात. अर्थातच आता नवीन जागेत भव्य असे संग्रहालय बांधायचा संकल्प रानडे यांनी सोडला आहे. त्यासाठी राज्य सरकारने बावधन बुद्रूक येथे मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे

