आदित्य ठाकरेंचा निशिकांत दुबेंवर हल्लाबोल
मुंबई-भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविषयी बोलताना बेताल वक्तव्य करत गरळ ओकली होती. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून भाजपचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे, असे ते म्हणाले. भाजप त्यांच्या खासदारांवर काही कारवाई करणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवाय त्यांनी आशिष शेलार यांच्या विधानावरही टीका केली.
आज भाजपने महाराष्ट्राची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी स्पष्टपणे केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन महिन्यांनंतरही या दहशतवाद्यांना भाजप पकडू शकले नाही. ते दहशतवादी कुठे गेले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आशिष शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केला.आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना निशिकांत दुबे यांच्यावरही निशाणा साधला. निशिकांत दुबे उत्तर भारतीय नाहीत. ते भाजप खासदार आहेत आणि ही भाजपची मानसिकता आहे. उत्तर भारत असा नाही, असे ते म्हणाले. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, देशभरातून लोक स्वप्ने घेऊन महाराष्ट्रात येतात. हा भाजपचा खेळ आहे की ते फोडा आणि राज्य करा. आमचा लढा सरकारविरुद्ध होता, कोणत्याही भाषेविरुद्ध नाही. आमचा लढा भाजपच्या सत्तेविरुद्ध होता, जो हिंदीच्या सत्तेविरुद्ध होता, कोणत्याही भाषेविरुद्ध नाही. मी हेच म्हणू इच्छितो की निशिकांत दुबे हे उत्तर भारताचे प्रतीक नाहीत आणि मी असे म्हणू इच्छितो की असे लोक आहेत जे आग लावू इच्छितात. जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांचे राजकारण चालणार नाही.
भाजप खासदाराच्या वक्तव्यामागे बिहार आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा फोडा आणि राज्य करा असा खास खेळ आहे. महाराष्ट्राविषयी मनात खोलवर असलेला द्वेष हे भाजपचे सत्य आहे, आणि शिवाय भाजपला फक्त द्वेष, विष कालवणे, समाजांमध्ये तेढ निर्माण करणे यावरच निवडणुका जिंकता येतात. त्यांना कधीही शांततेच्या मार्गाने किंवा विकासाच्या मुद्यांवर निवडणुका जिंकता येत नाही.
पुढच्या काही दिवसांत भाजपचे पाळलेले ‘डमी’ लोक महाराष्ट्र, मराठी, आणि आपल्या संस्कृतीविषयी द्वेषपूर्ण बोलतील, जेणे करून आपण चिडून त्यांच्या या जाळ्यात अडकावे. भाजपच्या या डमी लोकांकडून मराठी आणि महाराष्ट्राविषयी जाणीवपूर्वक द्वेष पसरवला जाईल, जेणेकरून मराठी समाज आणि एखाद्या विशिष्ट समुदायात फूट पाडता येईल, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ही भाजपच्या राजकारणाची पद्धत आहे. भाजपने या दोन व्यक्तींवर कारवाई केली नाही, तर भाजपला महाराष्ट्राचा खरोखरच द्वेष आहे, हे निश्चित होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

