भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न–अरविंद शिंदे
पुणे-पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला नामक तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणाव निर्माण झाला आहे. सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, घटनेनंतर कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर अरविंद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यानंतर झोन २ चे पोलीस उपायुक्त मा. मिलिंद मोहिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, अजित दरेकर, मेहबुब नदाफ, राज अंबिके, प्राची दुधाने, सीमा सावंत, अनुसया गायकवाड, सुंदर ओव्हाळ, उषा राजगुरू, माया डुरे, ॲड. राजश्री अडसुळ, मंदा जाधव, प्रदिप परदेशी, राजेंद्र भुतडा, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, विनोद रणपिसे, भगवान कडू, रवि पाटोळे, कृष्णा सोनकांबळे, मतिन शेख, आबा जगताप, दिपक ओव्हाळ, राज घेलोत, देविदास लोणकर, संतोष सुपेकर, अमित कांबळे, चेतन पडवळ आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
अरविंद शिंदे म्हणाले, मागील 12 वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या बाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे. यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या विटंबनेच्या घटनेमधून भाजप समाजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवत असून पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला. पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार करण्यात आले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत सुरज शुक्लाला खाली उतरवून ताब्यात घेतले.
प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड हे म्हणाले की, ‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा सुरज शुक्ला नामक व्यक्ती वाराणसी मधून आलेला आहे येताना तो हत्यार सोबत घेवून आला होता. वाराणसी येथील काँग्रेसचे स्थानिक अध्यक्षांशी चर्चा करून सदर व्यक्ती कोणत्या पक्ष किंवा संघटनेशी संबंधित आहे का? ही चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.’’?

