महावितरणच्या ९१ उच्चदाब व १२ हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित
इतर मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न
पुणे, दि. ६ जुलै, २०२५- महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून महावितरणच्या एमआयडीसी व आयटी पार्क भागातील ९१ उच्चदाब व सुमारे १२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि. ६) सकाळी ११ ते दुपारी १ असा वीजपुरवठा बंद केला होता. तशी सूचना वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध केली होती. मात्र देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरु करताना दुपारी २.१० वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा ९१ उच्चदाब आणि सुमारे १२ हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला आहे.
पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तब्बल ६३ मेगावॅटहून अधिक भार इतरत्र मार्गाने वळविण्याचे काम सुरु असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. हिंजवडी भागातील एमआयडीसी, आयटी पार्क, रायसोनी पार्कचा भाग, डॉहलर कंपनी तसेच विप्रो सर्कलच्या परिसराला याचा फटका बसला आहे. दरम्यान ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

