मुंबई-मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे आव्हान भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. उद्योजक सुशील केडियाने देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा, अशा शब्दात आव्हान दिले होते. परंतु केडियाने आता माघार घेतली आहे. परंतु, आता दिनेश लाल यादव यांनी केलेल्या आव्हानामुळे नवीन वाद सुरू होणार आहे.
दिनेश लाल यादव म्हणाले, अशा प्रकारची गोष्ट देशात कुठेही घडू नये. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो आणि या विविधतेतूनही एकतेचे उदाहरण घालून देतो. गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकांनी असे वागू नये आणि त्यांनी स्वतःला सावरावे. मी मराठी बोलत नाही. मी उघड आव्हान देतो, तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे म्हणत त्यांनी थेट ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.
पुढे बोलताना दिनेश लाल यादव म्हणाले, हे तोडण्याचे राजकारण करू नका. जोडण्याचे राजकारण करा. तुम्ही घाण राजकारण करू नका. मी स्वतः एक राजकारणी देखील आहे. राजकारण लोकांच्या भल्यासाठी असले पाहिजे, असे मी मानतो. देशाच्या भल्यासाठी असली पाहिजे. कोणाची क्षमता असेल की, तो अनेक भाषा शिकू शकतो. तर त्याने शिकली पाहिजे. मराठी फार चांगली भाषा आहे. प्रेमळ भाषा आहे. भोजपुरी देखील प्रेमळ भाषा आहे. गुजराती आहे, मराठी आहे, तेलगू आहे, तमिळ आहे.. प्रत्येक भाषेचे एक वेगळे सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सगळ्या भाषा शिकायला हव्यात.

