पुणे- मुठा नदीच्या पात्रात दिवाळी च्या काळात फटके स्टॉल ला आपण जागा देतो त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठी ढोल ताशा लेझिम पथकाला देखील जागा व सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’‘पुणे शहर’ राज्याची ‘सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर’ असल्याने, पुणे शहरात देशाच्या व राज्याच्या विविध भागातून शिक्षणा करीता हजारो विद्यार्थी येत असतात. स्वातंत्र्य पूर्व काळात सामाजिक ऐक्य व प्रबोधनाच्या हेतूने पुण्यनगरीत सुरू झालेला, विघ्नहर्त्या “श्री चा गणेशोत्सव” आज देशभरात आदर्श ठरत असून, देशाला विधायक सांस्कृतिक उत्सवाची दिशा व नेतृत्व देण्याचे काम करत आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली “ढोल ताशा लेझिम” पथके ही “श्रीच्या मिरवणुकीत” मोठ्या दिमाखाने सहभागी होतात. श्रीच्या गणेशोत्सवाची आरास, देखावे बघण्यास प्रेक्षकांची गर्दी होते, तशीच गर्दी “ढोल – ताशा पथकांचे वादन” बघण्या करीता देखील होते. या पथका मध्ये असंख्य ‘तरुण – तरुणी – विद्यार्थी’ सहभागी असतात. ‘संस्कृति व संस्कार’ जोपासले जात असतांना, त्यात विकृतीचा शिरकाव होऊ न देणे याकडे ‘ढोल – ताशा पथकांचे संचालक’ लक्ष देऊन असतात, मात्र ‘सरावा करिता व वाद्ये’ ठेवण्या करीता किमान सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे, सुरक्षितता देणे प्रशासकीय कर्तव्य ठरते.
तिवारी यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’या सरावा करीता “पुणे मनपा” ने “ढोल ताशा पथक संघटनेचे सहकार्य घेऊन” पथकांना रीतसर मान्यता द्यावी. मुठा नदीचे विस्तीर्ण पात्रातील जागा ‘पथकातील अंतराचे धोरण – वेळ ठरवून, विशिष्ठ कालावधी करीता, शुल्क आकारून (फटाके स्टॉल’चे धर्तीवर) उपलब्ध केल्यास पथके त्याकरिता अधिकृत वीज कने इ घेऊ शकतील, वाद्ये ठेवण्यास मंडप उभारून ढोल इ वाद्ये सुरक्षित ठेऊ शकतील तसेच पथकांची अधिकृत नोंद राहून पथकांना, वादकांना होणारा इतर खर्चीक जाच कमी होईल. मागील वर्षी “मुठा नदी पुरात अनेक ढोल वाहून गेले होते” व पथकांचे नुकसान झाले होते. वादन पथकाचे ‘अनावश्यक खर्च’ वाचल्यास, पथकांना सहभागी वादकांसाठी -कल्याणकारी योजना राबविता येतील. साधारण हे वादानाचे सराव २ – २|| महिन्या पेक्षा जास्त काळ होत नाहीत.
ठरवून दिलेली वेळ, अंतर इ प्रमाणे वादन केल्यास, परिसरातील जेष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रदीर्घकालीन आवाजाचा त्रास होणार नाही. जागा हस्तगत करणे, वाद्यांचे गोडाऊन, लाइट कने इ करीता वादक पथकांना होणारा त्रास, आर्थिक ससेहोलपट होणार नाही. कृपया मनपा प्रशासनाने सत्वर सकारात्मक निर्णय घ्यावा,असेही गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.

