पुणे: वाढते बलात्कार, चोऱ्या,दहशतवाद या विरोधात आज देशाचे गृहमंत्री पुण्यात असताना मनसेने तीव्र निदर्शने करण्याचा प्रयत्न केला या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी व वाढत चाललेल्या बलात्कार प्रकरण विरोधातील हा लढा सुरूच राहील असे यावेळी पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी म्हटले आहे या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश भोईबार यांनी केले आहे.
बाबर म्हणाले,’बुधवार दिनांक २ जुलै २०२५ रोजी कोंढवा बुद्रुक मध्ये मनाला तीव्र वेदना देणारी धक्कादायक घटना घडली आहे. डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत एका अज्ञात व्यक्तीने २२ वर्षीय तरुणीचा बलात्कार करण्याची घटना थरकाप उडवणारी आहे. जर अज्ञात व्यक्तींमार्फत धोकादायकपणे घरात शिरून महिला व तरुणीची सुरक्षितता भंग करण्यात येत असेल, त्यांच्या अस्मितेचे धिंडवडे काढण्यात येत असतील तर सर्व सामान्य नागरिकांनी याची दाद कोणाकडे मागायची हाच प्रश्न पडत आहे.
विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याची गेल्या काही महिन्यांची कारकीर्द पाहिली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार वाढत आहे. त्याच्या कैकपटीने पुण्यामध्ये गुन्हेगारीचा विस्तार वाढताना दिसत आहे. नुकतेच घडलेले कोंढवा बुद्रुक मधील बलात्कार प्रकरण, पुणे जिल्ह्यातील दौंड येथे पालखी सोहळ्या दरम्यान अल्पवयीन मुलीवर कोयत्याने धाक दाखवून अत्याचार केल्याचे प्रकरण, स्वारगेट येथे 26 वर्ष तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण, शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण आणि होऊन व इतर गुन्हेगारी प्रकरणांमुळे पुणे शहरातील संपूर्ण नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण तयार झाले आहे. स्वतःच्या घरामध्ये बसून देखील स्वतःच्या सुरक्षिततेची हमी आमच्या पुण्यातील नागरिक देऊ शकत नाहीत.
या संपूर्ण गुन्हेगारी व महिलांबाबत घडलेल्या हिंसाचार प्रकरणांची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. अशा पद्धतीच्या घटना थांबाव्यात याकरिता ठोस पाऊल पुणे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अद्याप पर्यंत उचलण्यात आलेलं नाही. पुणे पोलिसांचा जो धाक या गुन्हेगार व नीच प्रवृत्तीच्या लोकांवर असायला हवा होता तोच धाक या गुन्हेगारांनी आमच्या पुणेकरांवर निर्माण केला आहे. मुळात ही लोक येतात कुठून यांची पुण्यामध्ये गुन्हेगारी करण्याची हिम्मत होते कशीच. पुणे पोलीस प्रशासन खरंच आपल्या पुणे शहरातील महिला व तरुणींची अस्मिता न वाचवण्या इतकं असक्षम आहे का ? संपूर्ण शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण करून हे गुन्हेगार मोकाटपणे फिरतात कसे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पुण्यातील नागरिक त्रासले आहेत.
भारतातील संपूर्ण पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारत असलेले केंद्रीय गृहमंत्री श्री अमित जी शहा तसेच महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारत असलेले राज्याचे गृह तथा मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्व विषयांची जबाबदारी घेऊन ही प्रकरणे थांबवावीत यासाठी योग्य ते कठोर निर्णय घ्यायला हवे होते. पुणे शहरातील प्रत्येक नागरिक सुरक्षितपणे स्वतःच्या शहरांमध्ये वावरू शकत नसेल तर हे पुणे पोलीस प्रशासनाचे अपयश म्हणावं लागेल. त्यामुळे या सर्व विषयांना अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन घेण्यात आले होते परंतु या नाकारते सरकारने पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून महाराष्ट्र सैनिकांना ताब्यात घेतले.

