जे ठाकरेंचे नाही राहिले ते फडणविसांचे काय राहणार ?
मुंबई-
इम्तियाज जलील आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. फडणवीस यांना माहिती आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी केव्हाही त्यांची साथ सोडू शकतात. जे उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ शकतात, ते उद्या इतर कुणी ऑफर दिली तर त्यांच्यासोबतही जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची चाल खेळली आहे.
इम्तियाज जलील यांनी यावेळी मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसणार असल्याचाही दावा केला. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा फटका बसेल. सध्या मराठी माणसांना जे हवे आहे, तेच होत आहे. आम्ही विरोधात असूनही शिवसेना ही मराठी माणसाची ताकद आहे हे मान्य करतो, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाद्वारे एमआयएम भविष्यात महाविकास आघाडीशी आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा दावा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी दगाफटका करू शकतात अशी भीती देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी राज व उद्धव यांना एकत्र आणण्याचा प्लॅन आखला आहे, असे ते म्हणालेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे सद्यस्थितीत मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतरही वातावरण शांत झाले नाही. आता उद्या शनिवारी मुंबईत राज व उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याद्वारे हे दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांची ही एकी पुढील सर्वच निवडणुकांत दिसून येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

