सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक व केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणूनही ओळख आहे. त्यांची कंपनी गुंतवणूक व बाजारपेठेतील विश्लेषणाचे काम करते.
मुंबई- काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.
महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण या प्रकरणी वाद झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला केलेली मारहाण व त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे स्थिती अधिकच चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केडियोनोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उपरोक्त आव्हान दिले आहे.
काय म्हणाले सुशील केडिया?
मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

