पुण्याचे प्रश्न,पुण्याचे आमदार,सभापती पुण्याचे आणि मंत्री पुण्याचे….विधानसभेत पहा कसा जुळून आला की आणला योग..
पुण्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना तालिका अध्यक्ष म्हणून चेतन तुपे उपस्थित होते. उत्तर देण्यासाठी माधुरी मिसाळ होत्या, तर प्रश्न विचारणारे पुण्यातील सर्व आमदार होते. त्यामुळे या प्रश्नावर दुपारी २.४५ ते ३.३९ या दरम्यान ५४ मिनिटे सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच सीएमपी, रिंगरोड, प्रस्तावित मेट्रो, उड्डाण पूल हे प्रकल्प लवकर मार्गी लागावेत, अशी मागणी करण्यात आली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात चर्चेसाठी विरोधक प्रतीक्षेत असताना हे पुणेरी रिंगण त्यासाठी आडवे आणल्याचा आरोप या प्रकरणी होत होता .
पुणे शहरातील वाहतूक धोरणाचा कोंडीचा प्रश्न गंभीर झालेला असताना अतिक्रमणे, रस्त्यावरील अनधिकृत होर्डिंग यांसह अन्य कारणांनी त्यात आणखी भर पडत आहे. याविरोधात आज पुण्यातील आमदारांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला. शहरातील विदारक स्थिती सभागृहात मांडून २०४७ पर्यंतचे नियोजन सोडा, आत्ता पुण्यातील कोंडी सोडविण्यासाठी काय करणार? ते सांगा, नागरिकांना दिलासा द्या, अशी आर्त हाक आमदारांनी दिली आहे. सुमारे तासभर केवळ पुण्यातील कोंडी, प्रस्तावित प्रकल्प, सुरू असलेल्या कामाची गती वाढविणे असे मुद्दे आमदारांनी मांडले. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेणार असल्याचे तालिकाध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले,पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी मांडली. त्यावरभीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, बापू पठारे, शंकर जगताप, राहुल कुल, विजय शिवतारे, प्रशांत बंब, योगेश सागर आदी आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला.
शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिकांना होणारा मनस्ताप, वाहनांची वाढलेली भरमसाट संख्या यावर उपाययोजना केल्या जात नाहीत, पोलिस, महापालिका आणि ‘आरटीओ’कडून दुर्लक्ष होत आहे. महापालिका रस्त्यांचे रुंदीकरण करत असली तरी त्यावर वारंवार अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंगमुळे वाहतूक कोंडी आहे. अपघातांच्याभीतीने घराबाहेर पडलेली व्यक्ती परत येईल का नाही, असा विचार पुणेकरांच्या मनात येतो. याबाबत शासन काय करणार, असा प्रश्न सुनील कांबळे यांनी उपस्थित केला.”दाट लोकवस्तीमध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करणार ही मागणी पूर्ण होत नाही. पथारीधोरणाची अंमलबजावणी होत नाही. नो एंट्रीमध्ये वाहने घुसत आहेत, त्यावर काय कारवाई करणार? यावर शासन करणार आहे. शहरात रस्त्यात लाकडी पहाड उभारून फ्लेक्स लावले जात आहेत. वारंवार सांगूनही महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न हेमंत रासने यांनी विचारला.
आमदारांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर प्रश्न उपस्थित केले. त्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले. “शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेकडून रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र या नव्या रस्त्यांवर अनधिकृत फलक, व्यावसायिक अतिक्रमण आणि पार्किंगमुळे वाहतूक कोंडी पुन्हा गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने अतिक्रमणे हटविली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा मिसाळ यांनी विधानसभेत दिला.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी म्हणाल्या ,’ पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार पुण्यामध्ये एकूण ४० लाख ४२ हजार ६५९ इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग, नो होल्टिंग झोन करणे, सिग्नल व्यवस्था अद्ययावत करण्यात येत असून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत स्मार्ट सिग्नल, सीसीटिव्ही यंत्रणा अधिक अद्ययावत करण्यात येत आहे. पुणे शहराची सन २०५४ पर्यंत होणारी वाढ लक्षात घेऊन वाहतुक सुरळीत व सक्षम करण्यासाठी रिंगरोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे. मुख्य कार्यालय व क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर वाहतूक पोलिस विभाग व पुणे महानगरपालिकेचे संबंधित विभाग यांच्या नियमितपणे वाहतूक सुधारणा विषयक बैठका घेऊन वाहतूक दिव्यांची व्यवस्था, चौक सुधारणा. वाहतूक बेटांची निर्मीती, पथ दुभाजक उभारणी, वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, दिशादर्शक फलक बसविणे, लेन माकिंग, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवणे, वाहतुकीस अडथळा होणाऱ्या बसथांब्यांचे स्थलांतर अशा आवश्यक कामांची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील इतर घटकांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये सूचना हरकती मागविल्या जाणार आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीं सोबत बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

