मुख्यमंत्री, पालकमंत्री, महानगरपालिका व आमदारांची संयुक्त बैठक बोलवून निर्णय घ्या; पठारे यांची पावसाळी अधिवेशनात मागणी
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (ता. ०३) पुणे शहरासह वडगावशेरी मतदारसंघातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, अंमलात न आणलेले उपाय व नागरिकांना होणारा त्रास अधोरेखित करत कार्यवाहीची मागणी केली.
पठारे यांनी येरवड्यातील स्व. बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक येथे उड्डाणपूल उभारण्याची गरज स्पष्ट केली. “वडगावशेरी मतदारसंघात आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सतत व्हीव्हीआयपींची ये-जा होते. परिणामी वाहतूक थांबवली जाते, सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो,” असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे नमूद केले. गुंजन चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ग्रेड सेपरेटर व पादचाऱ्यांचा विचार करून विमानतळाहून पुण्याला जाताना वाहनांकरिता अंडरपास करत सिग्नल फ्री वाहतूक करता येईल, असेही ते म्हणाले.
पदपथांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. “संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे का? किंवा ती होणार आहे का?” असा थेट प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. कळस ते दिघी दरम्यानचा रस्ता अरुंद असून गेल्या १०-१२ वर्षांपासून रुंदीकरणाची वाट पाहत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पीएमआरडीकडून होत असलेल्या रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा पीएमआरडीएकडून मिळणारा मोबदला खूपच कमी आहे. डीपी आराखडा मंजूर न झाल्यामुळे हा अन्याय शेतकऱ्यांवर होतोय,” असेही त्यांनी नमूद केले.
पुणे-नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग ज्या पद्धतीने काढला, त्याच धर्तीवर आळंदी रोडवरील ३ किमी लांबीचा बीआरटी मार्ग काढण्याचीही मागणी त्यांनी व्यक्त केली.
एकूणच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, महानगरपालिका व आमदार तसेच संबंधित विभागांची एकत्र बैठक घेणे गरजेचे असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी ठामपणे अधिवेशनात सांगितले.

