मुंबई: वडगावशेरी मतदारसंघातील बहुतांशी भाग दरवर्षी पावसाळ्यात गंभीर पूरस्थितीला सामोरा जात असतो. येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी, कळस अशा भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीचे पाणी घरांमध्ये शिरते. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले.
ते म्हणाले, मागील वर्षी शांतीनगर परिसरात अतिवृष्टीमुळे मुळा नदीला पूर आला होता. या पुरामुळे शांतीनगरसह एकतानगर, आदर्शनगर, निंबोजीनगर या दाट लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरले. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती, की सुमारे ६५० घरांना अग्निशमन दल व प्रशासनाच्या मदतीने तत्काळ स्थलांतरित करावे लागले. पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे घरातील वस्तूंचे, कागदपत्रांचे व जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. एकूणच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते.
वडगावशेरी मतदारसंघातील नदी काठच्या भागांमध्ये पुन्हा ही परिस्थिती उद्भवू नये व पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी काही मागण्या सभागृहात स्पष्टपणे मांडल्या. ज्यात, नदीकाठच्या भागात तातडीने पूर प्रतिबंधक भिंती उभाराव्यात, जलनिकासी यंत्रणा सक्षम करून पाणी साचू नये यासाठी पायाभूत सुधारणा कराव्यात, पूरस्थितीच्या संभाव्य घटनांपूर्वी नागरिकांना वेळेत इशारा मिळावा यासाठी यंत्रणा स्थापित करावी, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ नियोजनबद्ध पद्धतीने काढावा या मागण्या प्रामुख्याने समाविष्ट होत्या. सर्व उपाययोजना तात्पुरत्या नाही, तर कायमस्वरूपी स्वरूपात राबवाव्यात अशी त्यांनी मागणी केली.
या मागण्यांच्या संदर्भाने पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघातील पूर प्रश्न दरवर्षीचा न राहता कायमस्वरूपी सुटला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. सरकारनेदेखील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन याबाबत कार्यवाही सुरू करावी.”
राज्य सरकार पठारे यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा आहे.

