पुणे : केनिया मधील नैरोबी येथे झालेल्या पहिल्या जूनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या रोलबॉल संघांचा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रोलबॉलचे संस्थापक आणि इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशनचे सचिव राजू दाभाडे तसेच महिला संघाची कर्णधार प्रांजल जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सत्कार सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, कॉसमॉस कन्स्ट्रक्शन ग्रुप संचालक मेहुल शाह, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, राज्य रोलबॉल संघटना अध्यक्ष संदीप खर्डेकर, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.
प्रशिक्षक हेमांगिनी काळे, फिटनेस ट्रेनर तेजस्विनी यादव, तसेच टीम सपोर्टर प्राची फराटे, मिलिंद क्षीरसागर, आणि फोटोग्राफर सुभाष सुर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
डॉ. यल्लप्पा जाधव म्हणाले, जागतिक रोलबॉल स्पर्धेतील मुलींची कामगिरी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात विविध कारणांनी मानसिक ताण वाढला आहे. अशा वेळी योग, ध्यान आणि सकारात्मक संवादाद्वारे मानसिक आरोग्य जपणे ही आपली जबाबदारी आहे.
संदीप वांजळे म्हणाले, रोलबॉल हा अत्यंत चांगला खेळ आहे. आता खेळाडूंना चांगले दिवस आले आहेत. खेळांमध्ये करिअर केले जाऊ शकते आणि सोबतच आरोग्यही उत्तम राहते. खेळातून केवळ शरीरसंपदा नव्हे, तर मानसिक ताकदही वाढते. भारताने वर्ल्ड कप जिंकणं ही खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
संदीप खर्डेकर म्हणाले, रोलबॉल या खेळाचा जन्म २० वर्षांपूर्वी पुण्यात झाला आणि आज हा खेळ ५७ देशांमध्ये खेळला जात आहे. ही पुणेकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. खेळ झपाट्याने वाढत असून त्याचे जनक म्हणजेच राजू दाभाडे यांचे हे यश आहे.
हेमंत जाधव म्हणाले, रोल बॉल विश्वचषक जिंकणे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद यश आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे प्रांजल जाधव ही पुण्यातील मुलगी या जागतिक विजेत्या संघाची कर्णधार आहे. हा फक्त क्रीडाजगतासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.

