मुंबई-राज्यात सध्या ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास काँग्रेससाठी आघाडी ठेवणं अवघड होईल, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशीच आघाडीबाबत चर्चा करेल. राष्ट्रवादी जर एनडीएसोबत गेली, तर महाराष्ट्रात काँग्रेससाठी त्यांच्यासोबत आघाडी कायम ठेवणे शक्य नाही, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हा कौटुंबिक मुद्दा आहे. मात्र ते एकत्र आल्यास शिवसेनेच्या पारंपरिक मतांची एकजूट होऊ शकते आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत, मात्र त्यांच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. म्हणूनच सध्या विधानसभेत त्यांचे अस्तित्व नाही.
राष्ट्रवादीच्या गटविलीनीकरणावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, तोही त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. पण जर हा गट एनडीएमध्ये सामील झाला, तर काँग्रेसला त्यांच्याशी आघाडी शक्य होणार नाही. त्यामुळे आघाडी तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हा सुद्धा कौटुंबिक मुद्दा आहे. कोणी कोणात विलीन व्हायचे आणि त्या पक्षाचा प्रमुख कोण असेल, हे तेच ठरवतील.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शशी थरूर हे परदेशात पाठवण्यात आलेल्या प्रतिनिधीमंडळाचा भाग होते आणि एक सदस्य म्हणून सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणे, त्यांचे कर्तव्य होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

