कंपनी-संचालकांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई शक्य, सीबीआय-पोलिस केसही:स्टेट बँक २१ दिवसांच्या आत ही फसवणूक रिझर्व्ह बँकेकडे अहवाल स्वरूपात सादर करेल. नंतर प्रकरण सीबीआय किंवा पोलिसांकडे दिले जाईल. त्यानंतरची कारवाई रिझर्व्ह बँक करेल.
मुंबई-उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या कर्ज खात्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ‘घोटाळा’ म्हणून घोषित करणार आहे. बँकेने कंपनीचे माजी संचालक अनिल अंबानी यांचे नाव रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) कळवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आरकॉमने शेअर बाजाराला सांगितले की त्यांना एसबीआयकडून २३ जून २०२५ रोजी हे पत्र मिळाले.एसबीआयने म्हटले की, आरकॉमने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. रकमेचे संशयास्पद हस्तांतरण आढळले. कर्जाचा मोठा भाग अनधिकृत कामासाठी वापरला होता. हे कर्ज ऑगस्ट २०१६ पूर्वीचे आहे. १० नोव्हेंबर २०२० रोजी एसबीआयनेही कंपनीचे खाते फसवणूक म्हणून घोषित केले. सुप्रीम कोर्टाने २७ मार्च २०२३ रोजी ते रद्द केले. डिसेंबर २०२३ मध्ये, बँकेने पुन्हा कारवाई सुरू केली. एखादी बँक एखाद्या खात्याला घोटाळा म्हणून घोषित करते, तेव्हा त्याची माहिती २१ दिवसांत आरबीआयला द्यावी लागते.
कंपनी आणि तिच्या संचालकांना पुढील पाच वर्षांपर्यंत बँका, आर्थिक संस्था किंवा निधीपुरवठा करणाऱ्या अन्य संस्था कर्ज देणार नाहीत. कंपनीने फसवणुकीची रक्कम परत केली, तर कर्जयोग्यतेची पत परत मिळू शकते.
कंपनी व संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकते.नादारी आणि दिवाळखोरी प्रक्रिया कायदा २०१६ नुसार आधीच दिवाळखोरीत आहे. मात्र फसवणुकीचे प्रकार ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचे असल्याने फौजदारी कारवाई शक्य आहे. रिझर्व्ह बँकेचे २०१६ मधील परिपत्रक यासंदर्भात मार्गदर्शन करते. अशाच प्रकारच्या प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात कारवाई झाली होती.
अनिल अंबानी यांच्या वकिलाने एसबीआयच्या निर्णयाला एकतर्फी आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन म्हटले आहे. वकिलाने म्हटले की, हे सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टाचे निर्णय आणि आरबीआयच्या निर्देशांच्या विरुद्ध आहे. ही नोटीस अवैध आहे.
आरएचएफमधून निधी वळवल्याबद्दल सेबीने अनिलना २०२४ ते २०२९ पर्यंत बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली आहे. २०२० मध्ये त्यांनी यूकेच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले. आरकॉमचा चिनी बँकांकडून ७,७०० कोटी रुपयांचा कर्जाचा खटला हरल्यानंतर त्यांनी असे केले.
एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या रांगेत ६ व्या क्रमांकावर असलेल्या अनिल अंबानींवर देश-विदेशात पैैसे वळवणे, बनावट हमी, कर्ज थकबाकी आदी आरोप आहेत. आरकॉम दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहे. कंपनीवर ४०,४१३ कोटींचे कर्ज (व्याजासह ७० हजार कोटी रु.) थकीत आहे. बीएसईनुसार रिलायन्स एडीए समूहाच्या चार सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४४,५९६ कोटी रुपये आहे. तथापि, रिलायन्सने २०२५ मध्ये ८०० कोटी रु. आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ३३०० कोटींचे कर्ज चुकते करून स्टँडअलोन कर्जमुक्तीचा दावाही केला आहे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अलीकडेच फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीसोबत भारतात फाल्कन २००० जेट विमाने निर्मितीसाठी भागिदारी केली आहे. दसॉल्टने २०२८ पर्यंत भारतात निर्मिती झालेल्या पहिल्या फाल्कन विमानाची डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

