मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचं मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
दिशा सालियन हिची हत्या व लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. यासंदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, शवविच्छेदन अहवालात दिशाच्या शरीरावर कोणताही लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार झाल्याचे संकेत नाहीत. तिच्या मृत्यूचे कारण डोक्याला जबर मार लागल्यामुळे झालेलं आहे.
पोलिसांनी हेही नमूद केलं की, दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही थेट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या आरोपांना कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिका फेटाळण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहेदिशा ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती, आणि सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन्ही प्रकरणांना जोडून काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मात्र, आता पोलिसांच्या सखोल तपासानंतर त्या आरोपांना अधिकृतरीत्या खोटं ठरवलं गेलं आहे.

