पुणे: कोंढवा मध्ये एक उच्चभ्रु सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत घरात शिरलेल्या एका 22 वर्षीय तरुणाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची दहा पथके कार्यरत झाली आहे.
याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार एका 28 ते 30 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मूळ अकोलाची रहिवासी असून मागील दोन वर्षापासून पुण्यात भावासोबत राहते.तरुणी कल्याणीनगर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत तरुणी तिचा भावा सोबत राहते. तिचा भाऊ परगावी कामानिमित्त गेला होता. बुधवारी (2 जुलै) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी फ्लॅट जवळ दारात आला आणि त्याने दरवाजा वाजविला. तरुणीने घराचे सेफ्टी डोअर उघडले. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले आणि बँकेचे कुरिअर आहे असे सांगितले.तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले आणि दरवाजा उघडण्यास भाग पाडले .तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर अचानक स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिचे डोळे जळजळले त्यानंतर आरोपी तरुण घरात बळजबरीने शिरला.
त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले आहे. मी परत येईल, असा मेसेज देखील मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत सांगितले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित परिसरात भीतीचे असुरक्षित वातावरण आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. तरुणीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. त्याआधारे आरोपीचा शाेध घेण्यात येत आहे.

