पुणे -एकीकडे विमानाने प्रवास करण्याकडे नागरिकांचा कल प्रचंड वाढला असला तरी दुसरीकडे अनेक घटनांवरून अलीकडच्या २ वर्षात विमानाचा प्रवास काही सहज सोपा राहिलेला नाही हेही दिसून येऊ लागलेले आहे. विमान मंत्रालय याबाबत किती गंभीर आहे याबाबतही काही समजू शकत नाही अशी अवस्था आहे.कधी प्रवासी मुंबईला त्यांच्या बॅगा दुबईला ..लेट होणारी विमाने..रद्द होणारी उड्डाणे ..विमानात होणाऱ्या चोर्या अशा अनेक बातम्या अलीकडे वाचनात येत असताना आता गोव्याहून पुण्याला येणारे विमान (एसजी-१०८०) २३ हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळल्याच्या बातमीची त्यात भर पडल्याने विमान प्रवास किती कठीण झालाय याची जाणीव होऊ लागली आहे.
त्याचे असे झाले ...गोव्याहून पुण्याला येणारे विमान (एसजी-१०८०) २३ हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खिडकीला बाहेरचा (आउटर) व मधला (मिडल) असे आणखी दोन प्रकारची आवरणे असल्याने खिडकीतून बाहेरील हवा विमानात शिरली नाही.त्यामुळे विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले.
मात्र संबंधित विमान कंपनीने याची दुरुस्ती न करताच लगेच पुण्याहून जयपूरसाठी उड्डाण केल्याने हवाई वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.विमानातील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी खिडकीच्या ‘आउटर’ व ‘मिडल’ अशा प्रकारच्या आवरणाचा उपयोग होतो. यात ‘इनर’ प्रकारचे आवरण निघाले. याचा विमानाला तत्काळ धोका पोचत नसला तरीही विमानाच्या संरचनेला बाधा निर्माण होऊ शकते.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व संरचनेच्या एकात्मतेसाठी हे आवरण निघणे योग्य नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. संबंधित स्पाइस जेट कंपनीने मात्र त्याची दुरुस्ती न करताच पुण्याहून जयपूरला हे विमान नेले. रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी या विमानाचे जयपूर विमानतळावर सुखरूप लँडिंग झाले.
स्पाइस जेटच्या विमानातील एका खिडकीवरील शोभेची चौकट उड्डाणादरम्यान सैल झाली. ही चौकट ही संरचनात्मक भाग नसून केवळ सावलीसाठी बसविलेली आहे. त्यामुळे विमानाच्या सुरक्षिततेवर किंवा संरचनेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब पूर्णतः सामान्य होता, असे कंपनीचे म्हणणे आहे
उड्डाणादरम्यान खिडकीचा आतील भाग निघून जाणे अपेक्षित नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरचनेच्या एकात्मतेसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. हा भाग निघाल्याचे पाहून प्रवाशांच्या मनोधैर्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी विमान कंपनीकडून अधिक काटेकोर देखभाल व उड्डाणपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे.

