पुणे-घराच्या खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी लाच मागणाऱ्या खासगी महिला रायटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सासवड येथील अनिता विनोद रणपिसे (वय ५४) या महिलेवर करण्यात आली असून, ती हवेली १ दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर खासगी रायटर म्हणून काम करत होती.
४५ वर्षीय तक्रारदार व्यक्तीने त्यांच्या घरावर कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. कर्जासाठी बँकेत १९८७ सालच्या खरेदीखताची प्रत आवश्यक होती. ही प्रत मिळवण्यासाठी ते हवेली १ दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या अनिता रणपिसे यांनी कार्यालयातील अधिकार्यांसाठी ५ हजार आणि स्वतःसाठी १ हजार रुपये अशी एकूण ६ हजार रुपयांची लाच मागितली.
या प्रकरणाची तक्रार २६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २७ व ३० जून रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी अनिता रणपिसे यांनी ३ हजार रुपये अॅडव्हान्स आणि उर्वरित काम झाल्यावर देण्याचे स्पष्टपणे सांगितले, यावरून तिची लाच मागणी निश्चित झाली.
१ जुलै रोजी हवेली तहसील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ६ हजार रुपये घेतल्यानंतर त्यातील १ हजार रुपये तिने परत दिले. लाच स्वीकारल्यानंतर अनिता रणपिसे हिला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उपअधीक्षक भारती मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

