मुंबई : जगभरातील अनेक जण उपचारांसाठी पुण्यात येत असतात, हे लक्षात घेऊन पुणे मेडिकल टुरिझम हब म्हणून जाहीर करावे, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत बोलताना केली.
सद्यस्थितीत आफ्रिका, मध्य पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया या खंडातील अनेक जण उपचारांसाठी भारतात येतात आणि खास करून पुण्यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. थायलंड, मलेशिया, जॉर्डन, तुर्कस्तान या देशांमध्ये मेडिकल टुरिझमला जगभरातून लोकं जातात, तर मेडिकल टुरिझमसाठी लोकं पुण्यातही येऊ शकतात. यासाठी राज्य शासनाने पुणे मेडिकल टुरिझम प्रमोशन बोर्ड स्थापन करावे. त्याद्वारे सर्व रुग्णालये, वेलनेस सेंटर्स आणि डायग्नोस्टिक सेंटर्स एकत्र आणावीत, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी भाषणात बोलताना सांगितले.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्रांचाही अंतर्भाव असेल, ही इंद्रायणी मेडिसिटीची उभारणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.

