मुंबई, दि. १ जुलै २०२५ :
ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनाविषयक कार्यप्रणाली (एसओपी) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कळवावी असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला त्याच्या आवेदनासंदर्भात लेखी पत्रोत्तर ठरलेल्या कालावधीत दिले गेलेच पाहिजे अशाही सूचना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या.
आज मंत्रालयात ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन प्रक्रिये संदर्भात आढावा बैठक पार पडली, त्यावेळी मंत्री महोदयांनी हे निर्देश दिले. यावर्षीची ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनासाठीची आवेदन प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. दरवर्षी ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनविषयक अनेक तक्रारी येतात. या तक्रारींचे कालबद्ध निवारण करण्यासाठीही मंत्री आशिष शेलार यांनी योग्य ते निर्देश सांस्कृतिक कार्य संचालकांना दिले आहेत. प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला त्याच्या मानधनविषयक आवेदनाचे उत्तर लेखी स्वरूपात वेळेत दिले गेले पाहिजे, त्यामुळे कलाकारांमधे प्रक्रियेसंदर्भात विश्वास अधिक वाढीस लागेल, असे ते म्हणाले. अनेक जिल्ह्यात ज्येष्ठ कलाकार मानधन विषयक समित्यांचे गठन अजून सुरू आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्येष्ठ कलाकार मानधन विषयक प्रक्रियेची कार्यप्रणाली पुन्हा एकदा कळवणे आवश्यक आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, सह संचालक श्रीराम पांडे यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

