मुंबई- राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात संताप व्यक्त केला. त्यानंतर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या जागेजवळ गेले आणि त्यांनी राज दंडाला हात लावला. यानंतर नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
नाना पटोले म्हणाले की, या सरकारमधले सदस्य बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. ज्या पद्धतीने सातत्याने मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. असे वक्तव्य अजिबात चालणार नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत नाना पटोले यांनी जोरदार संताप व्यक्त केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे, मला बरोबर वाटत नाही, हे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले.
मला कारवाई करायला भाग पाडू नका
यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या जागेजवळ जात आपला संताप व्यक्त केला. यानंतर राहुल नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी रद्द केली. त्यानंतर राहुल नार्वेकर म्हणाले की, नाना पटोले हे सभागृहाचे अध्यक्ष राहीले आहेत. राज दंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते, याची कल्पना तुम्हाला असेल. मला कारवाई करायला भाग पाडू नका, असे त्यांनी म्हटले.
नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही, नाना पटोले यांनी माफी मागितली पाहिजे, असे म्हटले. यानंतर नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करणार आल्याची घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली. सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे, यासाठी मी नाना पटोले यांना निलंबित करत आहे, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले. तसेच, तुम्हाला निलंबित केलेला आहे, तुम्ही सभागृहाच्या बाहेर गेलं पाहिजे, असे राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना म्हटले. यानंतर नाना पटोले सभागृहाच्या बाहेर निघून गेले. नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

