पुणे -विठ्ठलाच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्याच्या दौंड येथे घडली आहे.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. यात लहान – थोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. सर्वांना विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यातच दौंड येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही संतापजनक घटना घडली आहे. मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने जाणारे वारकरी चहापाण्यासाठी येथे थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना 2 जण गाडीवरून तिथे आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला.
त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांची लूट करून एका अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत काही अंतरावर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.

