उद्गारतर्फे पं. रोहिणी भाटे यांना नृत्यांजली अर्पण.

पुणे ता. 30: पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्यशैलीचा वारसा लाभलेल्या संगीताचार्य आसावरी पाटणकर यांच्या शिष्यांकडून बहारदार नृत्यरचना सादर करत गुरु पं. भाटे यांना नृत्यांजली अर्पण करण्यात आली. उद्गार संस्थेतर्फे आयोजित संवेदना या कार्यक्रमातून गुरु शिष्य परंपरेचा वारसा उलगडला.
बाल शिक्षण मंदिर, मयूर कॉलनी कोथरूड येथे हा कार्यक्रम पार पडला. यास ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज, उस्ताद उस्मान खान, उस्ताद फैय्याज हुसैन खान आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतः आसावरीताई व त्यांच्या शिष्यांनी नृत्यरूपी गुरुदक्षिणा देत रोहिणीताई भाटे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. दुर्गा स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उद्गारच्या शिष्यांनी ताल धमार अतिशय सक्षमपणे पेलत, त्याची सुंदर मांडणी करत तो पूर्ण तयारीनिशी प्रेक्षकांसमोर मांडला. ज्येष्ठ तबलावादक गुरु पं. अरविंदकुमार आजाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या रचना व काही बंदिशी सादर करत उत्कृष्ट पदन्यासाचे शिष्यांनी दर्शन घडविले.
अपर्णा पानसे यांनी कवी सुरदास रचित प्रीती करि काहू, सुख ना लह्यो यावर केलेला नृत्याभिनय रसिकांना विशेष भावला. तर साडेनऊ मात्रांच्या ताल सादरीकरणातून त्यांच्यातील सूक्ष्म अभ्यासू वृत्तीची झलक प्रेक्षकांना घडली. सीतेचे क्रोध हरण हा आसावरीताईंचा स्वरचित गतभाव तसेच राधा ही संरचना यातून नृत्याविष्कार आणि अभिनय याची सुंदर सांगड प्रेक्षकांनी अनुभवली. गुरूंकडून लाभलेल्या परंपरेला स्वत:च्या विचारातून दिलेला आयाम हे या एकूणच सादरीकरणाचे वैशिष्ट्य होते.
यावेळी तबला श्री आदित्य देशमुख, संवादिनी देवेंद्र देशपांडे, गायन अर्पिता वैशंपायन आणि बासरी आदित्य गोगटे यांनी समर्पक साथ दिली.
श्रृंगाली परांजपे यांनी सूत्रसंचालन केले.

