केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सजावटीचा शुभारंभ
पुणे : मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
बिबवेवाडी येथील सरपाले फ्लाॅवर मर्चंट येथे झालेल्या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम,आमदार हेमंत रासने, स्वागताध्यक्ष व उद्योजक कृष्णकुमार गोयल, पुष्प सजावटकार सुभाष सरपाले, मंडळाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सवात सार्वजनिक स्वरूपातील विधायक उपक्रम नेहमीच राबवले जातात. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. याउलट, एखादी वाईट घटना घडली, तर मात्र तिची लगेच दखल घेतली जाते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतरही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विधायक उपक्रमांची परंपरा जपली आहे. हा उत्सव केवळ दहा दिवसांचा नसतो, तर गणेशोत्सव मंडळांच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्याचे देशभरातून कौतुक होते, असेही त्यांनी सांगितले.
कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, सन १९५२ सालापासून गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग मंडळ यंदाच्या वर्षीही आकर्षक मथुरेतील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणार आहे. तब्बल ८० फूट रुंद १२० फूट लांब ३५ फूट उंच असा भव्य देखावा होणार आहे. त्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराच्या १४ पॅनल आणि जवळपास ३० मोर या वृंदावन देखाव्यात विहार करणार आहेत. राधा कृष्णाचे मंदिर २० फूट लांब आणि ४० फूट उंच असे भव्य प्रवेशद्वार या देखाव्यात असणार आहे. सरपाले बंधू सदर देखाव्याची निर्मिती करत आहे.

