मुंबई-भारत आरोग्य-तंत्रज्ञान (health-tech) क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असून एका नव्या अध्यायाची सुरूवात होत असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.ईटी टाइम्स नाऊने आयोजित केलेल्या ‘डॉक्टर्स डे परिषदे’मध्ये विचारांना चालना देणारे बीजभाषण त्यांनी केले. डॉ. जितेंद्र सिंह हे स्वतः एक प्रख्यात वैद्यकीय प्राध्यापक आणि मधुमेह तज्ञ आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावरून झेप घेतली आहे आणि भारताची शिखराच्या दिशेने वाटचाल सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रगतीत आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असेल, असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी स्वदेशी जीवशास्त्र संच नेले आहेत. ही मोहीम एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे लवकरच ‘अंतराळ औषधोपचार’ (Space Medicine) या नव्या वैद्यकीय शाखेचा जन्म होऊ शकतो, असे मंत्र्यांनी सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी विकसित भारत @2047 च्या संकल्पनेनुसार ” परस्पर समन्वय असलेली, सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी आरोग्य सेवा प्रणाली’’ निर्माण करण्याचे आवाहन केले.
“लवकरच, आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणामध्ये ‘अंतराळ चिकित्सक’ (Space Physicians) नावाची एक समर्पित शाखा असू शकते. या भविष्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे,” असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या विषयावर बोलताना, मंत्र्यांनी नमूद केले की भारतासमोर “द्वि-स्तरीय आव्हान” (bi-phasic challenge) आहे. एका बाजूला वाढत्या आयुर्मानामुळे वृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे युवा लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत सध्या आजाराच्या दुहेरी ओझ्याशी लढत आहे, विशेषत: कोविड-पश्चात काळात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दोन्ही आजारांशी एकाच वेळी मुकाबला करत आहे. यावर मात करण्यासाठी, त्यांनी मोठ्या प्रमाणावर तपासणी, लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारी वाढवण्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, टेलीमेडिसिन आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करण्याचे आवाहन केले.
भारताच्या अलीकडील जागतिक यशांवर प्रकाश टाकताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी अभिमानाने सांगितले की, प्रतिबंधात्मक आणि अचूक आरोग्यसेवेत भारत जागतिक नेता म्हणून उदयाला आला आहे. मंत्र्यांनी नॅफिथ्रोमायसिन (Nafithromycin) या देशातील पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैविक रेणूच्या निर्मितीप्रारंभाची घोषणा केली, जी भारताच्या औषधनिर्मितीतील नवोन्मेषामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी या यशाचे श्रेय खाजगी उद्योगासोबतच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सहकार्याला दिले. ते म्हणाले, “हे यश सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सुरुवातीपासूनच अखंड एकीकरणामुळे शक्य झाले.”

आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी परिवर्तनकारी दृष्टिकोन आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत या क्षेत्रांमध्ये व्यापक समन्वयाचे आवाहन केले. शाश्वतता आणि व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी संशोधन आणि आरोग्य सेवा वितरण या दोन्हीमध्ये खाजगी क्षेत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एकीकरणाची त्यांनी पुरस्कार केला.

