संजय राऊत यांनी ट्विट करत महायुतीवर टीका केली आहे. ते म्हणाले, हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण..ठाकरे हाच ब्रँड! (फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान), असे ट्विट करत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.
मुंबई-हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय महायुतीसरकारने रद्द केले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार देखील उपस्थित होते. आता यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून ठाकरे एकत्र येणार या भीतीने हा निर्णय घेतला तो मराठीच्या प्रेमाने नाही घेतला , अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
भाजपचा स्थायीभाव आहे खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे. पण भाजपचा हा स्थायीभाव एकनाथ शिंदे यांच्याकडे पण आला आहे का असे वाटायला लागले आहे. कालपर्यंतच यांची मंडळी म्हणत होती की हिंदीची सक्ती नसल्याचे म्हणत होते. कालपर्यंत नाही म्हणणारी माणसे जर ती गोष्टच नव्हती तर आज काय रद्द केले आहे यांनी? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री कालपर्यंत खोटं बोलत होते, असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जेव्हा तोंडघशी तेव्हा मात्र बोलतानाचा माइक एकनाथ शिंदे यांच्याकडे किंवा अजितदादांकडे देऊन आपण कसे वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. आज हा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्रीच जास्त तोंडघशी पडले आहेत.
मोर्चा काढला तरी आपल्याला काही फरक पडत नाही असे दाखवत होते आणि कालपर्यंत बेडूक फुगवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कितीही बेडूक फुगवले तरी त्याचा बैल होत नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. आम्ही नुसता मोर्चा काढायचा म्हणला तर तिघांना एकत्र यावे लागते. यात मी आज अजितदादांना सूट देते कारण त्यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली होती की होय, चौथीपर्यंत मराठीच असली पाहिजे आणि हिंदी पाचवीपासून बघूया. परंतु देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलू शकतात आणि त्यांचा खोटारडेपणा त्यांचे चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे.
जीआर रद्द केला पण मला आधी त्यांच्याकडून हे उत्तर हवे आहे की जर सक्ती नव्हती तर आज काय रद्द केले आहे? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. आता 5 तारखेच्या मोर्चाबद्दल बोलायचे झाले तर हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे मराठीवर प्रेम करतात त्यांनी मोर्चा काढायचा ठरवले आहे. आणि हा जो निर्णय रद्द केला आहे यात महाराष्ट्रातील मराठी माणसाचे यश आहे. आज देवेंद्रजी तोंडावर पडले आहेत. त्यांनी पाळलेली सगळीच पिलावळं तोंडघशी पडले आहेत.
आता समिती स्थापन करणार आहेत, हे मुख्यमंत्र्यांना आधी का सुचले नाही. मुख्यमंत्री स्वतःला फार विद्वान समजतात. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मराठीच्या मुद्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर काय होईल, अशी भीती त्यांना वाटली. म्हणजे केवढा छद्मीपणा, केवढा कपटीपणा यांच्यात रूजला आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

