बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा प्रत्येक घरात पोहोचवा
इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्यावरील व्याख्यान
सकल हिंदू समाज पुणे यांच्या वतीने आयोजन
पुणे : बाजीराव पेशवे हे असे योद्धे होते की जे एकही लढाई हरलेले नाहीत. त्यांनी संपूर्ण देशाचे संरक्षण केले. भारतमातेच्या प्रत्येक कणावर बाजीराव पेशवे यांचा हक्क आहे. कमरेला गाडगे आणि हातात झाडू असा पेशव्यांविषयी जो खोटा इतिहास पसरवला जात आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. हा ब्रिटिशांचा अपप्रचार आहे. जर पेशवाईत खरोखरच गाडगे हातात असते, तर लहुजी वस्ताद, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक भगव्या झेंड्यासाठी पुन्हा उभे राहिले नसते. आजही पेशवाईला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. त्यासाठी बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा प्रत्येक घरात पोहोचवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले.
सकल हिंदू समाज पुणे यांच्या वतीने अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांची महती सांगणारे व्याख्यान नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, कुणाल टिळक, मोहन शेटे आदी उपस्थित होते. जगन्नाथ लडकत यांनी बाजीराव पेशवे यांच्या विविध शौर्यगाथा तसेच पालखेडच्या लढाईचा संपूर्ण इतिहास उलगडला.
जगन्नाथ लडकत म्हणाले, कोणत्याही महान योद्ध्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल बोलताना, त्यांच्या विषयी आपला अभ्यास किती आहे, याचा विचार केला पाहिजे. आज महान व्यक्तींच्या नावाखाली विनाकारण जाती-जातीमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. अशा गोष्टींमुळे ऐतिहासिक वारसा लाभलेले सांस्कृतिक पुणे शहराचे नाव बदनाम केले जात आहे. समाजात असा तेढ पसरवणाऱ्यांना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देण्याची गरज आहे. राजा छत्रसाल यांची कन्या मस्तानी बाईसाहेब यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले होते. त्या शुद्ध शाकाहारी होत्या आणि भक्तिभावातही तल्लीन होत असत. अजिंक्य योद्धा बाजीरावांच्या निधनाची बातमी कळताच श्रीमंत मस्तानी बाईसाहेबांना इतका तीव्र धक्का बसला की त्या क्षणी त्यांचे प्राणोतक्रमण झाले. हा इतिहास अनेकांना माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.
विद्या घटवाई यांनी सूत्रसंचालन केले.

