पुणे-पुण्यातील भाडे नियंत्रण कायदा न्यायालयातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. रविंद्र हिंदुराव पवार (४०) आणि अमित बबन भुसारी (३४) अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत. प्रकरणी त्यांच्याविरोधात सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
50 वर्षीय तक्रारदार यांचा विठ्ठलवाडी सिंहगड राेड, हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क या साेसायटीतील एक फ्लॅट भाडेतत्वावर दिला हाेता. परंतु त्यांचा भाडेकरु सदरचा फ्लॅट खाली करत नव्हता. त्यांनी त्याची तक्रार सक्षम प्राधिकारी, भाडे नियंत्रण कायदा न्यायालय पुणे यांच्याकडे दाखल केली होती. या खटल्याच्या अनुषंगाने भाडे नियंत्रण कायदा न्यायालयाने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देऊन भाडेकरुच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटचा ताबा तक्रारदाराला देण्याचा आदेश दिला हाेता.
या आदेशाची पूर्तता करण्याची जबाबदारी कोर्टाने लिपिक रविंद्र पवार व अमित भुसारी यांच्यावर टाकली. पण या दोघांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाही करुन फ्लॅटचा ताबा तक्रारदारास देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर, एसीबीचे पाेलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचला असता, आराेपी यांनी सिंहगड राेडवरील हाॅटेल राधा प्युअर व्हेज याठिकाणी लाचेची मागणी करुन ती स्वीकारत असताना रंगेहाथ अटक केली. याबाबत आराेपी विराेधात सिंहगड राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

