हर्षित शंकर यांच्या वादनास रसिक पुणेकरांची दाद
पुणे ता. २७: जगविख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या तालमीत तयार झालेले अवघे २२ वर्षीय हर्षित शंकर रंगमंचावर आले.. आपल्या सुरेल वादनातून आणि मधुर संवादातून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं..आषाढसरींच्या साक्षीने सजलेले त्यांचे बासरीवरील जादुई स्वर रसिकांना विलक्षण अनुभूती देऊन गेले. हा सूरमयी सोहळा काल रसिकांनी याची देही याची डोळा अनुभवला. व्योमी मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या प्रियांका यादव यांच्या संकल्पनेतून शंकर ध्वनी हा कार्यक्रम पार पडला. खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद, सारंगधर साठे, अनिल कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वैष्णवी डेरे यांच्या भरतनाट्यम प्रस्तुतीने मैफलीची सुरुवात झाली. प्रणवा कारम्, सिद्धिविनायकम् तसेच अधीर बिराजे, बासरी श्याम या रचनांचे बहारदार नृत्य सादरीकरण करत त्यांनी रसिकांची मने जिंकली. हर्षित शंकर यांनी पारंपारिक शास्त्रीय वादनातून प्रारंभ केला. रात्रीच्या प्रहरातील राग जोग सादर करत आलापामधून स्वरांचे सौंदर्य उलगडले. त्यांच्या वादनातून श्रोत्यांना गौरवशाली परंपरेचे दर्शन घडले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीत उपशास्त्रीय वादन पेश करत हर्षित शंकर यांनी वेगळ्या उंचीवर नेले. पहाडी धून, तू ही रे..या त्यांच्या रचना ऐकताना रसिकांचे भान हरपले. महादेवाचे आदि आणि अनंत रूप उलगडणारे त्यांचे विलोभनीय स्वर रसिकांना विशेष भावले. वैष्णव जन जो , रघुपती राघव, हरे रामा हरे कृष्णा अशा भक्तिमय रचनांनी त्यांनी आपला प्रस्तुतीची स्वरमय सांगता केली.
आशिष रागवाणी (तबला), शुभम उगले (पखवाज), रोहित कुलकर्णी (कीबोर्ड), अपूर्व द्रविड (तालवादक) त्यांना समर्पक साथ दिली. तर अनघा हरकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुण्यात प्रथमच झालेल्या शंकर ध्वनी कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. येणाऱ्या काळात राज्यभर हा कार्यक्रम घेण्याचा मानस प्रियांका यादव यांनी व्यक्त केला.
हर्षित शंकर यांच्या वादनाने भारावून गेलेल्या वैभव लव्हाळे यांनी शंकराचा वेणूनाद अशी उत्स्फूर्त कविता सादर केली.
“हा केवळ वेणूनाद नव्हता साक्षात माधव अवतरला,
ऐकण्या या शंकरास आज शंकर स्वये रसिक जाहला,
ती राधा जी बावरली होती ते वृंदावन येथे अवतरले,
पुन्हा ती यमुना कर्णरंध्रातुन वाहून पुण्यनगरास पावन केले…
हे सूर बासरीचे जाऊदेत त्रिभुवणी हीच माझी प्रार्थना,
साष्टांग हे दंडवत सुरांना आणि सुरामागच्या कलावंतांना.”

