- स्वारगेट,कात्रज,पुणे स्टेशन,अप्पर,न.ता.वाडी,हडपसर व भेकराईनगर या आगारांमध्ये एकूण ८०२ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
- प्रत्येक महिन्यात एका आगारामध्ये सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराच्या शृंखलेचे आयोजन.
- भेकराईनगर डेपोत १०१ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान.
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भेकराईनगर आगारात सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन आज करण्यात आले होते.ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे येथे उपचार घेत असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध होण्याच्या उदात्त हेतूने,पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या संकल्पनेतून ही शिबिरांची शृंखला सुरू करण्यात आली आहे.या उपक्रमा अंतर्गत पीएमपीएमएलच्या सर्व आगारांमध्ये,दोन्ही मुख्यालयांमध्ये तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालयात क्रमानुसार दरमहा एका ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.या शृंखलेतील सातवे शिबिर भेकराईनगर आगारात पार पडले असून या शिबिरात १०१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.आतापर्यंत स्वारगेट,कात्रज,पुणे स्टेशन,अप्पर,न.ता.वाडी,हडपसर व भेकराईनगर या आगारांमध्ये एकूण ८०२ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे.पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच लगतच्या उपनगरांमध्ये “लाईफलाइन” म्हणून ओळख असलेल्या पीएमपीएमएलकडून या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जात आहे.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.भेकराईनगर आगाराचे पालक अधिकारी तथा बीआरटी मॅनेजर व वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे तसेच आगार व्यवस्थापक विजयकुमार मदगे यांनी विशेष प्रयत्न केले. शिबिरास पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, स्थापत्य अभियंता दत्तात्रय तुळपुळे व कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.

