पुणे: तालुका पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांना दिला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मागील तीन वर्षांपासून दिला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे चौकशीसाठी अधिकृत पत्राद्वारे मागणी केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन आर्थिक वर्षांसाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आले नाहीत. परिणामी, गाव पातळीवर निष्ठेने काम करणाऱ्या ग्रामसेवकांमध्ये नाराजी व असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार पठारे यांनी सांगितले.
बापूसाहेब पठारे यांच्या निवेदनातील प्रमुख तीन प्रमुख मागण्या
१)) २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांचे पुरस्कार का दिले नाहीत, याचे स्पष्टीकरण देण्यात यावे.
२) यंत्रणात्मक किंवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
३) मी केलेल्या मागणीवर कोणती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, हे स्पष्ट करावे.
“मी केलेली मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी. ज्यामुळे उत्तम काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान होईल. त्यांनाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल”, असे मत आमदार पठारे यांनी व्यक्त केले.पठारे यांनी केलेल्या मागणीमुळे ग्रामविकासात योगदान देणाऱ्या ग्रामसेवकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

