पुणे दि. 24: खरीप हंगाम २०२५ मध्ये सर्व प्रकारच्या बियाण्याचे वितरण व विक्री व केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘साथी पोर्टल’ प्रणाली वरूनच होणार आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत आग्रह धरावा, असे आवाहन पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
परराज्यात उत्पादित झालेले व महाराष्ट्रात वितरण व विक्री होणाऱ्या बियाण्यांना साथी पोर्टल अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बियाणे उत्पादक व विक्रेत्यांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्यात येणार आहे. साथी प्रणालीमुळे बियाणे उद्योगात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे.
या पोर्टलमुळे बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक व विक्रेते यांच्यात समन्वय वाढवून डिजिटल प्रणाली मुळे सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे व्यवस्थापन सोपे होणार आहे व बियाणे व्यवसायातील गैरप्रकाराला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
दत्तात्रय गवसाने, विभागीय कृषी सहरांचालक, पुणे: येत्या खरीप हंगामात सर्व बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेते यांनी साथी पोर्टल प्रणालीचा वापर करूनच बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून बोगस बियाण्यांबाबचे गैरप्रकार होणार नाहीत. या प्रणालीचा वापर करणार नाहीत अशांवर कारवाई केली जाणार आहे.
0000

