श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रम
पुणे : युवा कलाकार रागिणी शंकर यांचे व्हायोलिनमधून उमटणारे हृदयस्पर्शी सूर, भुवनेश कोमकली यांचे भावपूर्ण, बहारदार गायन आणि विख्यात ज्येष्ठ गायक पंडित व्यंकटेश कुमार यांचे स्वर्गीय सूर यांचा आनंद रसिकांनी अनुभवला.
सोलापूरातील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक, समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे पुण्यात पुण्याई सभागृह पौड रस्ता येथे या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक रागिणी शंकर यांनी खूप दिवसांनी कार्यक्रमात सकाळचा राग वाजवत आहे, असे सांगून वादनाची सुरुवात राग नटभैरवने केली. गायकी अंगाच्या तंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या रागिणी शंकर यांनी व्हायोलिन वादनावरील पकड दर्शविताना रागातील बारकावे अतिशय सफाईदारपणे मांडत रसिकांची वाहवा मिळविली. पुण्यात आले आहे तर मराठीतील अभंग ऐकवू की नाट्यगीत असे रागिणी यांनी रसिकांना विचारताच आषाढी वारी असल्याने आधी अभंग नंतर नाट्यगीत ऐकवा हा रसिकांचा प्रेमळ हट्ट पुरा करताना त्यांनी माझे माहेर पंढरी हा अभंग तर नरवर कृष्णासमान हे नाट्यगीत सादर केले. त्यांना तनय रेगे यांनी तबल्यावर समर्पक साथ केली.
यानंतर सुप्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांची गायन मैफल रंगली. कोमकली आणि पुजारी कुटुबियांचा स्नेहबंध उलगडून भुवनेश यांनी मैफलीची सुरुवात आपले आजोबा पं. कुमार गंधर्व यांनी रचलेल्या तोडी रागातील देवो मोहे धीर या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत लयीत बीन बजाए माई ही पारंपरिक बंदिश सादर केली. तराणा सादर केल्या नंतर भुवनेश कोमकली यांनी राग बिलावलमधील पिवन लागो आणि बाजे रे डमरुवा या पारंपरिक बंदिशी ताकदीने सादर केल्या. संत सुरदास रचित बासुरी बजाए या भक्तिरचनेने भावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या नंतर रितु आयी बोले मोरा रे ही रचना ऐकविली. आत्मा, उत्पत्ती आणि संसार यांच्यातील परस्पर संबंधांचे गूढ उकलून दाखविणारे संत कबीर रचित शून्य गढ शहर, शहर घर बस्ती हे अध्यात्माचे तत्त्व मांडणारे निर्गुणी भजन सादर केले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला), स्वप्नील गायकवाड, कबीर शिरपूरकर (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.
सायंकाळच्या सत्रात विख्यात शास्त्रीय गायक पंडित व्यंकटेश कुमार यांचे दमदार गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात मुलतानी रागातील गोकुल गाव के छोरा रे या पारंपरिक रचनेने केली. याला जोडून द्रुत लयीत नैनन मे आनबान ही रचना प्रभावीपणे सादर केली. चमेली फुली चंपा या रचनेतून अनेक सुगंधित फुलांप्रमाणे स्वरांचे फुललेले आविष्कार रसिकांना भावले. द्रुत लयीत धीट लंगरवा कैसे ही हमीर रागातील पारंपरिक रचना सादर केली.
खमाज रागातील ठुमरी सादर करताना अब कैसे घर जाऊ मै, बाट रोकत कुमर कन्हैय्या ही पारंपरिक रचना सादर केली. शुद्ध स्वर आणि सहज मांडणीतून श्रोत्यांसमोर नटखट कृष्ण कन्हैयाचे रूप साकार झाले. रामदासी मल्हार राग सादर करताना बादरवा गरज आए ही रचना सादर केली.
पुणेकर रसिकांसारखा श्रोता मिळण्याचे भाग्य लागते असे सांगून पंडित व्यंकटेश कुमार यांनी भक्तिगीत सादर करतो म्हटल्यावर रसिकांनी त्यांना कानडी भक्तिगीत सादर करण्याची विनंती केली. यावर आनंदित होऊन संगीतक्षेत्रात भाषेचा भेद नाही, संगीत हे एकमेव क्षेत्र आहे जेथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होते, असे सांगून देवीचे वर्णन करणारी कमले कमलालये ही कानडी रचना तन्मयतेने सादर केली. भाषेच्या पलिकडे जाऊन गायनाचा आनंद रसिकांनी भरभरून लुटला.
मैफलीची सांगता समझा मना कोई नही अपना, नीस दिन रामनाम जपना या भैरवी रागातील भक्तिरचनेने केली. पंडित व्यंकटेश कुमार यांच्या भावपूर्ण, भारदस्त, सुरेल सादरीकरणातून साकार झालेल्या स्वरांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात रसिक भावविभोर अवस्थेत रममाण झाले. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागनाथ नागेशी (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
गुरुकृपेची महती सांगत पंडित व्यंकटेश कुमार म्हणाले, गुरुंची सेवा करण्यात आनंद वाटतो. अगदी दहाच राग गा पण गायनात शुद्धता ठेवा आणि सतत रियाज करत रहा असे आग्रही मत नोंदवून शिष्याने नेहमी प्रामाणिकपणे गुरू सांगतील त्यानुसार शिकत राहिल्यास त्याचा उद्धार होईल असेही आवर्जून सांगितले. सहकलाकारांना भरभरून दाद देत, त्यांचे वारंवार कौतुक करून, रसिकांशी संवाद साधत त्यांनी मैफलीत अनोखे रंग भरले.
हेमांगी पुजारी आणि ललिता दातार यांनी प्रा. श्रीराम पुजारी यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलाकारांचा सत्कार कलापिनी कोमकली, डॉ. नवनीत तोष्णीवाल, डॉ. विद्याधर बोराडे, डॉ. किरण जोशी यांनी केला तर सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले.
गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद
Date:

