आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाला काळिमा फासवणारी घटना उघडकीस आली आहे. काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट ‘टोकन दर्शन’ पास तयार करून विक्री केल्याचा प्रकार समोर आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी सात भाविकांची फसवणूक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी उघडकीस आली. हे भाविक विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्या टोकन पासचे स्कॅनिंग करण्यात आले. स्कॅनिंग दरम्यान हे पास बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेत चौकशी सुरू केली.
चौकशीत या भाविकांनी सांगितले की, सासवडच्या परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना 100 रुपयांच्या मोबदल्यात ‘दर्शन टोकन’ देऊ केले. जुने अधिकृत पास स्कॅन करून त्यांच्या आधारे बनावट टोकन तयार करून ते भाविकांना देण्यात आले होते. मात्र या भाविकांना पास कोणी दिले, कुठे दिले, आणि नेमके कसे मिळाले याची ठोस माहिती देता आलेली नाही. मंदिर प्रशासनाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. यामध्ये प्रत्यक्ष रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी 10 ते 12 तासांचा वेळ लागतो, तर अधिकृत टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात दर्शन मिळू शकते. याचाच गैरफायदा घेत काही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी बनावट पास तयार करून भाविकांची दिशाभूल केली.
दरम्यान, विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “कोणत्याही प्रकारे बनावट पासची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शेळके यांनी दिला. तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच मोफत टोकन बुक करावे आणि कोणत्याही मध्यस्थ, एजंट अथवा रस्त्यावर मिळणाऱ्या दर्शन पासांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.

