पुणे, दि. 23: राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रती थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटकांकरीता ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचन (तुषार व ठिबक सिंचन) घटकाकरीता अनुदान व पूरक अनुदान पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती-अल्प व अत्यल्प भूधारक करीता राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक 55 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 25 टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पूरक अनुदान 10 टक्के असे एकूण अनुदान 90 टक्के, तर अनुसूचित जातीतील बहु भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक मधून 45 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 30 टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पूरक अनुदान 15 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक करीता राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक 55 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 25 टक्के, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पूरक अनुदान 10 टक्के असे एकूण अनुदान 90 टक्के, तर बहु भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक 45 टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान 30 टक्के, बिरसा मुंडा क्रांती योजना पूरक अनुदान 10 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin वर ऑनलाईन अर्ज करावा, अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

