मुंबई-
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्याही वेळकाढूपणा करतील, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
दरम्यान नार्वेकर यांनी दोनदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायमुर्ती 2 वेळा आरोपीला भेटले, असे म्हणत त्यांनी शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर टीका केली आहे. यामुळे उद्या काय निकाल लागणार हे जनतेला समजले आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे.
सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, दीड वर्षांपासून ही सुनावणी सुरू आहे. आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा आहे. वेडावाकडा निकाल लागला तर जनतेला सर्व माहिती असायला हवे. भरत गोगावले यांची प्रतोद पदाची निवड बेकायदेशीर आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तर अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड वैध ठरवण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
उद्धव ठाकरे म्हणाले की, जर न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटत असतील तर आम्ही त्या न्यायमूर्तींकडून काय अपेक्षा करावी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
..तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की न्यायाधीश आरोपीला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे. लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे. त्यात ते उघड उघड भेटत आहेत.आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे. देशात लोकशाही आहे की नाही, हे ठरवणारा निर्णय असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बुधवारी शिवसेना अपात्रतेप्रकरणी निर्णय येणार आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.

