राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : आयुर्वेद, समाजसेवा, संशोधन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम य. वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या उत्तुंग जीवनकार्याच्या आढावा घेणा-या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. ‘दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर प.य. तथा दादा वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दिनांक २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संगीता विनायक वैद्य खडीवाले, निखिल विनायक वैद्य खडीवाले आदी उपस्थित होते.
चरित्रग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असून सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आयुर्वेद, संशोधन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
वैद्य विनायक वैद्य खडीवाले म्हणाले, सर्वच क्षेत्रातील नवीन पिढीला दादांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आणि बहुआयामी कायार्चा परिचय व्हावा, याउद्देशाने हा चरित्रग्रंथ साकारण्यात आला आहे. याद्वारे त्यांच्यासमोर एक खरा आदर्श साकारावा, असा आमचा उद्देश आहे. आयुर्वेद, समाजसेवा, संशोधन यांसह जनकल्याण रक्तपेढी, जनकल्याण नेत्रपेढी, हरी परशुराम औषधालय कारखाना व दवाखाना, निराधार मुलांकरता आधार केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये औषधी वनस्पती उद्यान उभारणी, निराधार महिलांकरता वंदनीय ताई आपटे महिला विकास प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांची उभारणी दादांनी केली आहे. त्यांनी आयुर्वेद व रा. स्व. संघाविषयी च्या १०० च्या पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. विविध क्षेत्रात दादांचे मोठे कार्य आहे. ते यामाध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
संगीता विनायक वैद्य खडीवाले म्हणाल्या, बीड सह पुणे जिल्ह्यामध्ये विविध १२५ ठिकाणी दादांनी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून १ लाखाहून अधिक रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्याच्या पुढे देवबांध या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सर्व डोंगर हिरवे करण्यासाठी दादांनी मोहीम हाती घेतली होती. याशिवाय वैद्य ग्रंथ भांडार, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार, आयुर्वेद प्रचारक व हिंदू तनमन, विश्व वैद्य संमेलने, अन्नकोट प्रदर्शने असे अनेक उपक्रम देखील दादांनी राबवले. मनपा कोटणीस दवाखान्यात एचआयव्ही एड्स करीता ३० वर्षे त्यांनी मोफत रुग्णसेवा दिली. तब्बल ४० वर्षे त्यांनी गुरुकुल पद्धतीने विनामूल्य आयुर्वेद प्रशिक्षण वर्ग घेतले. त्यांच्या कार्याची महती सांगणारा हा चरित्रग्रंथ ३२० पानांचा आहे. हा चरित्र ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

