पुणे : समाजात शिक्षण हा परिवर्तनाचा खरा पाया आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांना प्रगतीची संधी देणे हे अत्यंत महत्वाचे काम आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटचालीत अशी छोटी-मोठी मदत मिळणे ही काळाची गरज आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते आणि सेवा भाव वाढीस लागतो. श्री वेताळबाबा मंदिर ट्रस्ट व जय भवानी मित्र मंडळ यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांनी व्यक्त केले.
शिवकालीन श्री वेताळ मंदिराचे श्री वेताळ बाबा मंदिर ट्रस्ट आणि जय भवानी मित्र मंडळ पर्वती यांच्या वतीने गरजू ५०३ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून, दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. पर्वती पायथा येथील शिवकालीन वेताळ बाबा मंदिराशेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रमेश भागवत उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वह्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी हेमंत भाटी, अमोल हुबरे, निवास गाडेकर, आनंद भाटी, भरत आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा हेतू या उपक्रमामागे असून, वर्षभर विविध समाजोपयोगी कार्ये ट्रस्ट आणि मंडळाकडून राबवली जातात.
रमेश भागवत म्हणाले, पर्वती पायथा परिसरातील मुलांसाठी श्री देवदेवेश्वर संस्थान च्या वतीने मोफत मल्लखांब प्रशिक्षण वर्ग देखील सुरू करण्यात आला आहे, त्याला देखील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
किशोर ठाकूर म्हणाले, शिक्षण हे प्रत्येक मुलासाठी मूलभूत गरज आहे. गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजाने एकत्र येऊन अशा उपक्रमांत सहभाग घेतला, तर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचू शकते.

