निवडणुकीचे फोटो-व्हिडिओ 45 दिवसांत डिलीट होणार!
मुंबई-निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यानुसार, निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ केवळ 45 दिवसांसाठीच जतन केले जाणार असून, त्यानंतर ते हटवण्यात येणार आहेत. या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ही कारवाई लोकशाही, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाविरोधात असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र त्यांनीच आता पारदर्शकतेच्या विरोधात पाऊल उचलले आहे, हे अतिशय गंभीर चिंतेचे कारण आहे.
आंबेडकरांनी नेमके काय म्हटलंय?
प्रकाश आंबेडकरांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक नियम 1961 मध्ये केलेल्या सुधारणेमुळे अनेक निवडणूक संबंधित नोंदींवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित झाला आहे. या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी 2025 रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 75,97,067 मतांची संध्याकाळी 5 नंतर झालेली वाढ व सुधारित नियमावलीबाबत मी चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या सूचनांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय की, विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या मतदानाच्या संदर्भात चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध भारतीय संघ व इतर या सुरू असलेल्या केसची महत्त्वपूर्ण पुढील सुनावणी सोमवार, 23 जून 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. याप्रकरणी याआधी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला न्यायालयात उत्तर द्यायला सांगितले होते, असेही त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

