राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ ग्रंथाचे प्रकाशन
पुणे : अभिजात परंपरा आणि लोकपरंपरा, या एकमेकींना छेद देणाऱ्या नसून, सर्व समाजघटकांना समान धाग्यात गुंफणाऱ्या आहेत. त्या एकमेकींना पूरकच आहेत. आपली संतपरंपरा हा दोन्ही परंपरांना जोडणारा दुवा आहे, याचे प्रमाण डॉ. प्रकाश खांडगे संपादित ग्रंथातून मिळते. त्यामुळे हा ग्रंथ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले. संवाद, पुणे आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित आणि प्रा. डॉ. प्रकाश खांडगे संपादित या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २१) झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कवयित्री, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, महाराष्ट्र कला संस्कृती मंचच्या शैला खांडगे आदी मान्यवर व्यासपीठावर होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. मोरे म्हणाले, आपल्याला प्रदीर्घ अशी परंपरा लाभली आहे. तिचे जतन मौखिक स्वरुपात झाले. कालांतराने तिचे लिखित स्वरूप पुढे आले. वैदिक, अभिजन आणि बहुजनांची संस्कृती, हे पृथक नाहीत, ते एकाच विशाल संस्कृतीचे भाग आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ग्रंथाचे महत्त्व आहे. या ग्रंथाचा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, तो आजच्या भाषेत ‘पॅन इंडियन’ विचार आहे. शिवशक्तीचे आदीरूप हे या विचाराचे तात्त्विक अधिष्ठान आहे. ज्याप्रमाणे ज्ञानदेवांचे तत्त्वदर्शन पुढे संत एकनाथांनी भारुडांच्या – रूपकांच्या माध्यमातून लोकभाषेत आणले, तसेच लोकसंस्कृती व लोकपरंपरांनी ‘कलगीतुरा’ माध्यमातून तात्त्विक विचार लोकभाषेत मांडला आहे. परंपरांची अशी सरमिसळ, हा या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. आजच्या काळात अशा सामरस्य सांगणाऱ्या ग्रंथाचे लेखन करणे आणि ते प्रकाशित करणे अगत्याचे आहे. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, लोकपरंपरा हा संस्कृतीचा गाभा असतो. आपल्याकडे हा गाभा मौखिक परंपरेने जपला. आधुनिक काळात आपण या परंपरा नाकारून बुकिश झालो आहोत. शिवशक्ती सामरस्याचा धागा वेगवेगळ्या नावांनी सर्वदूर आहे. त्यांचा वेध प्रकाश खांडगे यांनी बंगाल, राजस्थान, कर्नाटक अशा ठिकाणांहून घेतला आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, या ग्रंथाच्या रूपाने विविध ठिकाणी विखुरलेले लोकसंचित एकत्रित आले आहे. लोकपरंपरांचे प्रायोगिक रूप जाणणाऱ्या खांडगे यांनी या ग्रंथाच्या संपादनाच्या निमित्ताने महत्त्वाचे कार्य केले आहे. गंभीर, वैचारिक लेखन प्रकाशित करण्याचे कार्य केल्याबद्दल साहित्य संस्कृती मंडळही अभिनंदनास पात्र आहे. मात्र, लोकसंस्कृतीचे विखुरलेले अभ्यासक, जाणकार, कलाकार यांना एकत्र आणून लोकसंस्कृतीचा सर्वांगीण अभ्यास करणारी प्रबळ संस्थात्मक यंत्रणा आपल्याकडे नाही, याची उणीव जाणवते. अशी यंत्रणा असल्याशिवाय युवा पिढीकडे हा अभ्यासाचा, संशोधनाचा वारसा कसा पोचणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. मीनाक्षी पाटील यांनी मंडळासाठी या ग्रंथाचे प्रकाशन हा आनंदाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. संकल्पनांचे स्पष्टीकरण, मांडणी आणि नंतर संहिता, अशा पद्धतीने केलेले लेखन – संपादन, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्या म्हणाल्या. मनोगत मांडताना संपादक – अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले, ढालगज भारुडाचा विचार करत असताना, हा विषय सुचला. कलगीतुऱ्याची अनेक हस्तलिखिते संग्रही होती, काही नव्याने मिळवली होती. त्या लोकभाषेला दार्शनिक विचारांचे अधिष्ठान हवे, या विचाराने संपादनाकडे वळलो. प्रारंभी संघर्ष मग संवाद आणि अखेरीस सामरस्य, असा त्रिविध प्रवास, अशी मांडणी मला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर इतरत्रही आढळली. त्यातून शिव-शक्ती गीतांचे व्यापकत्व लक्षात आले. जोगी, बाऊल, कलगीतुरा, यलम्माची गीते… यातून हेच एकत्व दिसते, याची जाणीव झाल्यावर ग्रंथाचे संपादन केले. प्रदीप ढवळ यांनी डॉ. खांडगे यांच्या या ग्रंथाचे मोल तरूण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी असे लेखन – संपादन व्यापक स्तरावर नेण्याचा प्रयत्न आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संवाद संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून लोकसंस्कृती आणि परंपरांचे दस्तऐवजीकरण झाले आहे, असे ते म्हणाले. प्रकाशन समारंभानिमित्त ‘भक्तिरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (कीर्तन), सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी भजन), संध्या साकी (भारूड), शाहीर पृथ्वीराज माळी (गोंधळ) व सहकलाकारांचा सहभाग होता. निकिता मोघे यांनी आभार मानले. स्वप्नील जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

