मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना शून्य टक्के व्याजराने तब्बल 1 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे. बँकेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा मोठा लाभ सत्ताधारी महायुतीला मिळण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत. काही महिलांनी छोटे-मोठे उद्योगधंदेही सुरू केलेत. त्यानंतर आता या योजनेंतर्गत मुंबईतील महिलांना चक्क शून्य टक्के व्याज दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजदराने करण्यात येणारा कर्जपुरवठा शून्य टक्के दराने करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
सद्यस्थितीत सरकारच्या 4 महामंडळाच्या योजनांतून लाभार्थींना 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दिला जातो. उदाहरणार्थ, पर्यटन महामंडळाच्या आई योजनेद्वारे महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्त्यांचे महामंडळ व ओबीसी महामंडळाच्या योजनांमधूनही महिलांना व्याजाचा परतावा दिला जातो. त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी या महिला या योजनेत बसत असतील तर त्यांनाही शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे प्रवीण दरेकर यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, एका महिलेला 1 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. त्यामुळे 5-10 महिला एकत्र येऊन उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वरील चारही महामंडळांचे संचालक, संबंधित खात्याचे सचिव व अतिरिक्त सचिव होते. या चारही महामंडळांच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिलेत.
सरकारच्या निर्णयानुसार मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल. त्यासाठी व्यवसायाची तपासणी केली जाईल. व्याजाचा परतावा आम्ही महामंडळाकडून मिळवण्याचा प्रयत्न करू. स्वयं-पुनर्विकास हौसिंग योजनेच्या धरतीवर मुंबईतील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
उल्लेखनीय बाब म्हणजे प्रवीण दरेकर यांनी एका पोस्टद्वारेही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाडक्या बहिणींच्या उद्योग-व्यवसायासाठी आणलेल्या कर्ज धोरणास राज्य सरकारच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून शून्य टक्के व्याजदरात कर्ज देऊन महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवास्थानी झालेल्या बैठकीत घेतला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ व पर्यटन संचलनालय या महामंडळांची व्याज परतावा योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न केली जाईल. या निर्णयामुळे मुंबईतील लाखो लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायाचे दालन मोकळे झाले व यामुळे लाडक्या बहिणींचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान राहील. महिलांच्या उद्योजिका बनण्याच्या स्वप्नांना बळ देणारा हा निर्णय घेतल्या बद्दल मुख्यमंत्री व सरकारचे मनःपूर्वक आभार, असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते.

