पुणे-
२१ जून २०२५ रोजी, वारीच्या दरम्यान, वारकऱ्यांनी पुण्यातील साधू वासवानी मिशनला भेट दिली. त्यांनी साधू वासवानी व दादा वासवानी यांच्या पवित्र समाधीस्थळी नतमस्तक होऊन भक्तिपूर्वक वंदन केले. यंदाचा त्यांचा दौरा पवित्र एकादशीच्या दिवशी घडल्याने एक अनोखा, दैवी संयोग अनुभवायला मिळाला.
समाधीस्थळी उभे राहून त्यांनी हृदयस्पर्शी अभंग गायले. काही वारकऱ्यांनी हवनातही सहभाग घेतला. एक कीर्तनकार भावुक होऊन म्हणाले, “साधूजी आमच्यासोबतच गात होते.”
सुधीर नामक एक नियमित वारकरी, म्हणाले, “मी दरवेळी पूर्ण आस्वाद घेतो — प्रत्येक भेट म्हणजे एक नवा आनंद.”
गणेश नामक जेष्ठ वारकरी व गटप्रमुख, अंतर्मुख होऊन म्हणाले, “मिशन जे करतं, तेच खरोखर ईश्वराने शिकवलं आहे — सेवा आणि करुणा. कोविडसारख्या जागतिक संकटातही मिशनची सेवा थांबली नाही, ही गोष्ट खूप बोलकी आहे. वयस्कर लोकांचा, आमच्यासारख्या मित्रांचा सन्मान आणि आपुलकीने केलेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. आता पुढच्या भेटीची वाट पाहतोय.”
मिशनकडून प्रत्येक वारकऱ्याला प्रेमपूर्वक स्वागत करत, उपवासाच्या दिवशी उपयोगी ठरतील अशी सामग्री—सरबताच्या बाटल्या, टॉवेल, रुमाल, उपवास चिवडा व चिक्की, दोन केळी आणि एक आंबा—कापडी पिशवीत दिली गेली.
ही वार्षिक भेट म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि एकात्मतेचा साक्षात अनुभव होता. वारकरी नवचैतन्याने त्यांच्या यात्रेवर पुढे निघाले आणि मिशनही त्यांच्या भेटीने अध्यात्मिक आनंदाने न्हालं. असं म्हणतात: “भक्ताची सेवा म्हणजेच देवाची सेवा!”

