आळंदीत कत्तलखाना होणार नाही

पुणे:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा सरकार योग्यवेळी शेतकरी कर्जमाफीचा आपला शब्द पूर्ण करेल अशी ग्वाही दिली. सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे ते शेतकऱ्यांना आश्वस्त करताना म्हणालेत. यावेळी त्यांनी जगातील पहिल्या 600 विद्यापीठांत नाव आल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे कौतुकही केले.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह पुणे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड, पालखी सोहळा, शेतकरी समस्या आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. वारी ही महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत येतात. ते सर्वजण आज पुण्यात थांबलेत. आम्ही या कार्यक्रमाशी जोडून आज योगाभ्यास केला. पुण्यातील महाविद्यालय यात सहभागी झाले. भव्य कार्यक्रम झाला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आज त्यांच्यामुळेच योग आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
पत्रकारांनी त्यांना पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, पण विभागांची स्थिती फारशी चांगली नाही, प्राध्यापकांचाही तुटवडा आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, सर्वप्रथम मी पुणे विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन करतो. जगातील पहिल्या 600 विद्यापीठांत आज पुणे विद्यापीठ आहे. मला अपेक्षा आहे की, पुढील वर्षी किंवा 2 वर्षांत पहिल्या 500 विद्यापीठांत आपली विद्यापीठे असतील.
जगातील पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील कुलगुरू व्यवस्थापन परिषद, सिनेटर, प्राध्यापक यांचे कार्य कौतुकास्पद आहे. तुम्ही ज्या तुटवड्याविषयी प्रश्न केला, त्याविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सर्वप्रकारच्या मान्यता दिल्या आहेत.
आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी आज पत्रकारांना हिनकस वागणूक दिली. त्याचे काही व्हिडिओ समोर आलेत. मुख्यमंत्र्यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. अनेकदा स्ट्रेस, तणावातून अशा गोष्टी घडतात. पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अशा संस्थांमधील नियुक्त्या सरकार करत नाही, तर त्या न्यायिक अधिकाऱ्याच्या माध्यमातून होतात, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आळंदीतील कत्तलखान्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. आळंदीच्या विकास आराखड्यातील एक आरक्षण कत्तलखान्यासाठी दाखवण्यात आले आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. मी स्वतः या कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिलेत. आळंदीत असे कोणतेही कृत्य होणार नाही याची हमी मी वारकरी संप्रदाय व वारकरी नेत्यांना देतो, असे ते म्हणाले.
सरकार शेतकरी कर्जमाफीचे आपले आश्वासन पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे ते म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले, सरकारचे सांगली व कोल्हापूरमधील पूरस्थितीवर लक्ष आहे. धरणांतून विसर्ग केव्हा सुरू करायचा व केव्हा बंद करायचा याचे नियोजन करण्यात आले आहे. शेजारच्या राज्यांशीही समन्वय ठेवला जात आहे. त्या राज्यांत आपला एक इंजिनिअर बसला आहे. पावसाळ्यात तो तिथेच असतो. त्याच्या माध्यमातून योग्य तो समन्वय साधला जात आहे. अर्थात निसर्गाचा भरवसा देता येत नाही. पण आपण आपल्या बाजूने पूर्ण नियोजन केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

