मुंबई-स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशांत तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख रुपये मिळणार, असा उपरोधिक टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजपला हाणला आहे.2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा आणून भारतातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करण्याचे कथित आश्वासन दिले होते. या माध्यमातून त्यांनी परदेशात काळा पैसा जमा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पण कालांतराने त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी एका बातमीचा दाखला देत पीएम मोदींचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर उपरोक्त टीका केली आहे.
भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेला पैसा 2024 मध्ये तिपटीने वाढला. मग आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख मिळणार. मोदींचे आणखी एक खोटे आश्वासन, असे अंजली दमानिया शुक्रवारी एक इंग्रजी बातमी पोस्ट करत म्हणाल्या.
काय आहे बातमीत?
अंजली दमानियांनी दाखला दिलेल्या बातमीत नमूद आहे की, 2024 मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिपटीने वाढून 3.5 अब्ज स्विस फ्रँक अर्थात 37,600 कोटींवर पोहोचला. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरूवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली. स्थानिक शाखा व अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा फुगला आहे, असे या बँकेने म्हटले आहे.
स्विस बँकेच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये स्विस बँकांतील भारतीय ग्राहकांच्या खात्यांतील रकमेत 11 टक्क्यांची (3,675 कोटी) वाढ झाली. यापूर्वीच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारतीयांचा पैसा 70 टक्के घसरून केवळ 1.04 अब्ज स्विस फ्रँक एवढाच राहिला होता. हा 4 वर्षांचा नीचांक होता. तत्पूर्वी, 2021 मध्ये भारतीयांचे 3.83 अब्ज स्विस फ्रँक स्विस बँकांत पडून होते. हा 14 वर्षांचा उच्चांक ठरला होता. त्यानंतरचा सर्वाधिक पैसा 2024 साली भारतातून स्विस बँकांच्या खात्यांत पोहोचला होता.

