
पुणे- विविध दिशांनी आलेल्या दिंड्या यांनी पुण्यातील वाहतूक ठप्प केली तरी पालखीच्या मार्गावर आणि दिंड्यांच्या स्वरात वर्षानुवर्षे जोपासून येणारा ओसंडून वाहणारा भक्तीभाव देखील आज पुण्यात पावसाच्या सरींसोबत बरसत राहिला . संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्यांचे आज मोठ्या भक्तिभावाने आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात स्वागत झाले.

आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) एम. जे.प्रदीप चंद्रन त्याचबरोबर उपायुक्त परिमंडळ क्र.१ माधव जगताप, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम , मुख्य अभियंता (प्रकल्प) युवराज देशमुख आदींनी स्वागत केले. तसेच संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी केले. यावेळी उपायुक्त परिमंडळ क्र.२ अरविंद माळी, महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर आदींनी स्वागत केले. यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी सारथ्य केले. सर्व दिंड्यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने जयत तयारी केलेली होती यामध्ये पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, त्याचबरोबर पालखी मार्गावरील स्वच्छता,आरोग्य सेवा इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती.

भेटीलागी जीवा लागलीसे आस!’ असा भाव मनात ठेवून, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीकडे निघालेला वारकऱ्यांचा भक्तीसागर शुक्रवारी (दि.२०) पुण्यनगरीत दाखल झाला आहे.संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता. १८) देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) आळंदीतून प्रस्थान झाले. या दोन्ही संतांचे पालखी सोहळे शुक्रवारी सायंकाळी पुण्यात आले आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात असणार आहे. रविवारी (ता. २२) सकाळी या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.



