पुणे-हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. या प्रकरणी कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.महायुती सरकारने राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली होती. पण या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत तिसरी भाषा पर्यायी असेल असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. शेवटी त्यांनी हवे ते करावे. पालकांनी मार्गदर्शन केल्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावा.कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही. संपूर्ण देशातील लोकसंख्येपैकी जवळपास 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या प्रकरणी पत्रकारांनी शरद पवारांना छेडले असता त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी विषद केले. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवले नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यानुसार सामान्यतः 3 महिन्यांत निवडणूक लागेल.आमच्यात मुंबईत उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे तिथे एकत्र लढायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ. या प्रकरणी आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून चर्चा करू.
शरद पवारांनी यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बँक (पीडीसीसी) रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या मुद्यावरही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीवेळीही ही बँक रात्री उघडली होती. आज या बँकेत हे दुसऱ्यांदा घडत आहे. बँक उशिरापर्यंत सुरूच का होती? बँकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघेडल? एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसत आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा, असे शरद पवार म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विरोध धुडकावून लावला आहे. ते नुकतेच यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले होते, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा असू नये. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरात 3 भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडूने 3 भाषांच्या सूत्राला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिले. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.
आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत असताना आपली मुले दुसरी एखादी भाषा अजून शिकत असतील, तर त्या भाषेतील ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषेचा आग्रह चुकीचा आहे. एनईपी केंद्र सरकारने एकट्याने तयार केली नाही. देशभरातील तज्ज्ञांनी मिळून ती तयार केली. ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, आदी बाबींचा सखोल विचार करण्यात आला. हे धोरण तयार करताना 3 वर्षे चर्चा झाली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर 3 भाषेचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.

