पुणे :- नैसर्गिक आपती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे तसेच नुकसानीच्या कठीण परीस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य बाधीत राखणे. या उद्देशाने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेची अमलबजावणी करण्यात येत आहे. ही योजना पुणे जिल्ह्यात मृग बहार सन 2025 अंतर्गत डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या 8 फळ पिकांसाठी राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेत सहभागी होण्याकरीता अथवा न होण्याकरीता घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बैंक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील, तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी 4 हे. मर्यादेपर्यंत आहे.
केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. पुणे जिल्हयासाठी कार्यान्वित विमा कंपनीचे नाव व पता- बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे, क्षेत्रिय कार्यालय, 4 था मजला, टॉवर नं. 07, कॉमर झोन आयटी पार्क, सम्राट अशोक पथ, येरवडा जेल रोड, पुणे 411006 व टोल फ्री क्र. 18002095959 तसेच ई-मेल bagichelp@bajajallianz.co.in असा आहे.
मृग बहार सन 2025 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. 1) संत्रा, पेरु, लिंबू, द्राक्ष (क) 30 जून 2025 पर्यंत, 2) चिकू, मोसंबी 30 जून 2025 पर्यंत, 3) डाळिंब 14 जुलै 2025 पर्यंत, 4) सिताफळ 31 जुलै 2025 पर्यंत राहिल. मृग बहार सन 2025 या वर्षासाठी अधिसूचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी प्रमाणे निर्धारित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय होईल. मृग बहारातील फळपिकांच्या विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरु करण्यात आले आहे.
योजनेत सहभाग घेण्यासाठी Agristak नोंदणी, आधार कार्ड, बैंक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, जिओ टॅग फोटो, ई पीक पाहणी असणे 100% बंधनकारक आहे अन्यथा विमा प्रस्ताव रद्द केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. मृग बहरातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in पाहता येईल.
शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करून घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

