पुणे: येथील एका बालकाश्रमातून माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोलीजवळील वाडेबोल्हाई येथील एका बालकाश्रमात चक्क शिपायानेच दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश नावाचा शिपाई गेल्या अनेक महिन्यांपासून बालकाश्रमातील एका 10 वर्षीय आणि एका 11 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करत होता.
वाघोलीजवळील वाडेबोल्हाई परिसरातील बालकआश्रमातील एका शिपायाने दोन मुलांवर अत्याचार करताना मुलांचे हातपाय बांधून ठेवल्याचे, तर काही वेळा त्यांच्या तोंडात बोळा कोंबल्याचेही समोर आले आहे. एवढेच नाही तर, जर कोणाला काही सांगितले, तर जीवे मारण्याची धमकीही तो मुलांना देत होता. या क्रूर कृत्यामुळे दोन्ही चिमुकले भीतीच्या सावटाखाली होते
या प्रकरणाची गंभीर दखल घेत, सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या संचित व्यवस्थापकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. व्यवस्थापकांना ही बाब कळताच त्यांनी जराही विलंब न लावता पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला घोडेगाव पोलिस ठाण्यात या शिपायाविरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता हा गुन्हा लोणीकंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी रमेशला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बालकाश्रमांमधील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

