विजय पटवर्धन फाऊंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे :
विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ध्वनी संयोजन,प्रकाश योजना सहाय्य,नेपथ्य सहाय्य, वस्तू संकेत,निर्माता,निर्मिती सहाय्य, वेशभूषा संबंधी काम करणाऱ्या पडद्यामागील ८ रंगकर्मींना गौरविण्यात आले.दहावी,बारावी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या रंगकर्मींच्या पाल्यांना सन्मानित करण्यात आले.सौ.वृषाली विजय पटवर्धन यांनी लिहिलेल्या नर्मदा परिक्रमे वरील ‘ अनुभूती ‘या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
नाट्यनिर्मात्या सौ.भाग्यश्री देसाई,उमा सरदेशमुख, सुवीर सबनीस , अभिजीत पणशीकर,रवींद्र भिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माधव थत्ते,रवी पाटील, शिरीष कुलकर्णी, विनायक कापरे, पुष्कर केळकर, प्रसाद घोटवडेकर, राकेश घोलप, संजय जाधव या पडद्यामागील कलाकारांचा सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम प्रशांत सभागृह(लोकमान्य नगर) येथे १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.
अभिनेते विजय पटवर्धन,सौ.वृषाली पटवर्धन,सुरेंद्र गोखले, अथर्व सुदामे,पवन वाघुलकर,धनंजय आमोणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. चिन्मय पाटसकर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रकाशयोजना स्पॉटचं ग्रुपिंग करणारा रंगकर्मी , घोड्यावर चढून ते ॲडजस्ट करणारा, संपूर्ण प्रयोगभर डिमरवर बसून योग्य वेळी ब्लॅक आऊट करणारा ऑपरेटर,कलाकारांचे संवाद नीट ऐकू जातील याची काळजी घेऊन योग्य म्युझिक पिस, योग्य वेळेला सोडणारा ध्वनी संयोजक,नेपथ्य उभे करणारा,अनेक फ्लॅट सीन गाडीवरून उतरवून ते रंगमंचावर योग्य पद्धतीने लावून नाटक संपल्यावर योग्य पद्धतीने गाडीत पुन्हा भरणारा मदतनीस, रंगमंच कामगार,कलाकार आणि तंत्रज्ञांना काय हवं नको ते बघणाऱ्या, नाटकाचा संपूर्ण हिशोब बघणाऱ्या निर्मिती प्रमुख अशा विविध ८ प्रकारातील पडद्यामागील कलाकारांना या कार्यक्रमात गौरविण्यात आल्याने हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
यावेळी बोलताना सौ.भाग्यश्री देसाई म्हणाल्या,’रंगकर्मींच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार त्यांना जबाबदारीची जाणीव देईल, पाठीवर थाप देईल,या शाबासकीतून त्यांनी आवडत्या क्षेत्रात मोठे होण्याचा प्रयत्न करावा. पडद्यामागे राबणाऱ्या हातांचा सन्मान करण्याचा विजय पटवर्धन फाऊंडेशनचा उपक्रम अनोखा आहे. कृतज्ञतेची ही जाणीव समाजात रुजणे आवश्यक आहे.सांस्कृतिक विश्व फुलायला त्यातून मदत होईल.’
सौ. वृषाली पटवर्धन म्हणाल्या,’खडतर शारीरिक व्याधींनंतर केलेली नर्मदा परिक्रमा संस्मरणीय ठरली.तेथे रोज लिहिलेले अनुभव पुस्तक रुपात आले, याचा आनंद आहे. पुस्तक विक्रीतून आलेला निधी परिक्रमेतील आश्रमाला दिली जाणार आहे ‘.

